Pimpri News : ‘माहिती देण्यास टाळाटाळ; डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे यांच्यावर तत्काळ कारवाई करा’

भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – वैद्यकीय विभागाकडून आरसीएच व एनयुएचएम कार्यक्रमाकरिता सन 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या स्टेशनरी, झेरॉक्स, प्रशिक्षण / कार्यशाळा वर झालेला खर्च इत्यादी बाबतची माहिती देण्यास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे हे टाळाटाळ करत आहेत. वारंवार माहिती मागूनसुद्धा अपूर्ण स्वरुपात माहिती दिल्याने तसेच माहितीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने डॉ. साळवे व डॉ. डांगे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, वैद्यकीय विभागामध्ये झेरॉक्स मशीन असताना देखील दरमहा हजारो रुपयांची बिले वैद्यकीय विभागामध्ये मंजूर केली जातात. ही सर्व बिले भोसरीतील एका दुकानातूनच काढलेली आहेत पिंपरी परिसरामध्ये अनेक दुकाने असताना भोसरी येथील दुकानामध्ये काढण्याचे वैद्यकीय विभागाचे प्रयोजन कळून येत नाही.

मंजूर बिलांची दिनांक वेगवेगळे असले तरी सर्व बिले सलग क्रमांकाची आहेत म्हणजेच या दुकानातून इतर कोणत्याही व्यक्तिला बिल दिले जात नाही. केवळ वैद्यकीय विभागामध्ये बिल दिले जाते त्यामुळे बिल बुक विभागामध्येच असल्याचा संशय येत आहे. तसेच दिनांक 10 फेब्रुवारी 2019 रोजी एकाच दिनांकाची प्रत्येकी 722 झेरॉक्स असलेली दोन बिले लावण्यात आलेली आहेत.

अनेक बिलांमध्ये खाडखोड करण्यात आलेली आहे. स्टेशनरी तपशीलामध्ये प्रत्येक साहित्य हे 52 नग प्रमाणात दर्शविण्यात आलेले आहे. परंतु, त्याचा वापर कुठे व कशासाठी केला आहे याचा बोध होत नाही. तसेच चहा व नाष्टा यासाठी प्रत्येकी 33 नग याप्रमाणे 2 बिले (एकूण रुपये 48880) याची जोडलेली आहेत ही बिले केवळ ऍडजेस्टमेंट म्हणून घेण्यात आल्याचे संशय येत आहे.

आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण अनुदान दिल्याचा आदेश जोडलेला आहे परंतु रक्कम दिल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे दिली गेली नाहीत. वैद्यकीय संचलनालय तथा अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करूनसुद्धा पूर्ण कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

कागदपत्रांमध्ये बनावट बिले, तसेच फेराफार असल्याचे दिसून येते आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2017 ते 2019 या कालावधीच्या ऑडिट रिपोर्टवरून 2017 मध्ये जवळपास 3.5 कोटी असलेला खर्च सन 2019 मध्ये सहा कोटीच्या वर झालेला आहे. अशा बनावट व बोगस कागदपत्रांच्या आधारे शासकीय पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील वाघेरे यांनी केला आहे.

सदरची बिले ही डॉ. वर्षा डांगे यांच्यामार्फत सादर केली गेली असून डॉ. पवन साळवे यांनी त्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून विशेष ऑडिट करण्याची विनंती करत माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या तसेच वारंवार अपूर्ण माहिती देऊन दिशाभूल करणार्‍या डॉ. पवन साळवे व डॉ. वर्षा डांगे यांचेवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.