Pimpri News : लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ; सहायक आयुक्ताची खातेनिहाय चौकशी
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश
एमपीसी न्यूज – लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी तीन वेळा संधी देऊनही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सहायक आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. श्रीनिवास रामचंद्र दांगट असे खातेनिहाय चौकशी करण्यात येणाऱ्या सहायक आयुक्तांचे नाव आहे.
दांगट हे पिंपरी – चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त या अ श्रेणीच्या पदावर ग क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. महापालिका आस्थापनेवरील गट ब मधील ‘प्रशासन अधिकारी’ या अभिनामाची सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी 29 जुलै 2013 रोजी या पदाची अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. दांगट यांना या पदावर नियुक्ती देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या 1 जुलै 2005 रोजीच्या आदेशानुसार, सरकारी सेवेतील गट अ ते ड मधील सर्व पदांवर सरळसेवेने करायच्या नियुक्त्यांसाठी लहान कुटुंबाची अतिरिक्त अट लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.
हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास 28 मार्च 2006 आणि त्यानंतर जन्माला आलेल्या मुलामुळे मी या पदासाठी अपात्र ठरविला जाईल, याची मला जाणीव आहे, असे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट नमुद आहे. दांगट यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती. त्यानुसार, त्यांना नियम 2005 नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास 24 फेब्रुवारी 21 रोजी पत्राद्वारे कळविले होते. तथापि, दांगट यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.
त्यामुळे त्यांना 6 मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर दांगट यांनी 28 मे रोजी खुलासा सादर केला. कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे स्टॅम्प पेपर उपलब्ध होत नाही. लॉकडाऊननंतर स्टॅम्प पेपर प्राप्त होताच प्रतिज्ञापत्र सादर करण्याची ग्वाही दिली. मात्र, त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळे 10 जून रोजी त्यांना पत्राद्वारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी अंतिम संधी देत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तरीही, दांगट प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ करत आहेत. यावरून दांगट यांना तीन अपत्य असल्याच्या तक्रारीस पुष्टी मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही गंभीर स्वरूपाची बाब असून दांगट यांनी गैरवर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्याअनुषंगाने दांगट यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.