Pimpri News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा पुरस्कार वितरण सोहळा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीकडून विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. त्या उपक्रमांचा बक्षीस वितरण आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 12) होणार आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 12) चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे होणार आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, क्रिकेट स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. त्या उपक्रमांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी होणार आहे. कोविड योद्धा सन्मान, तृतीयपंथी यांचा सन्मान तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांचा देखील कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.

कोरोना साथीचा काळ सुरू असल्याने शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंबईला न येण्याचे आवाहन राष्ट्रवादीकडून या निमित्ताने करण्यात आले आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीकडून रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे डिजिटल स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यावर मुंबई येथील मुख्य अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. सर्व शिबिरांमध्ये सुमारे 500 पिशव्यांचे रक्तसंकलन होईल असा विश्वास शहराध्यक्ष वाघेरे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.