Pimpri News: प्लाझ्मादानविषयी जनजागृतीची गरज, वायसीएममध्ये केवळ 348 प्लाझ्मा बॅगांचे संकलन

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना बाधीत रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. प्लाझ्मामुळे अनेकांना जीवनदान मिळत आहे. पण, कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येताना दिसून येत नाहीत. दिवसाला प्लाझ्माच्या 15 बॅगांची आवश्यकता असते. पण, दररोज केवळ 5 ते 7 दाते उपलब्ध होतात. त्यामुळे प्लाझ्मादानबाबत जनजागृतीची गरज आहे. कोरोनामुक्त रुग्णांनी देखील स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 39859 बाधितांपैकी 26220 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. प्रत्यक्षात मात्र वायसीएम रक्तपेढीत 20 ऑगस्टपर्यंत 200 एमएलच्या 348 प्लाझ्मा बॅगांचे संकलन झाले आहे. त्यामधील 341 प्लाझ्मा बॅगांचे वितरण केले असून 7 प्लाझ्मा बॅग शिल्लक आहेत.

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्ताद्वारे त्यातील प्लाझ्मा घेतला जातो. संबंधित व्यक्तीच्या शरिरातील ॲण्टीबॉडी तसेच विषाणूंबरोबर लढा देणाऱ्या पेशी म्हणजेच प्लाझ्मा. बरे झालेल्या रुग्णाचे रक्त घेऊन त्या रक्तावर काही प्रक्रिया करत हा प्लाझ्मा वेगळा केला जातो.

त्यानंतर अत्यावस्थ किंवा गरज असलेल्या कोरोना बाधीत रुग्णाच्या शरिरात हा प्लाझ्मा सोडला जाते. प्लाझ्माद्वारे संबंधित रुग्णाच्या शरिरातील रोगप्रतिकार शक्ती तसेच कोरोनाच्या विषाणूबरोबर लढणाऱ्या पेशी तयार होतात.

त्यामुळे रुग्ण लवकर यातून बरा होतो. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यशस्वी होताना दिसून येत आहे.

‘या’ रुग्णांवर होते प्लाझ्मा थेरपी

प्लाझ्मा थेरपी ही उपचारपद्धती कोणत्या रुग्णांवर करायची याचा निर्णय डॉक्टर घेत आहेत. जे रुग्ण इतर औषधांना प्रतिसाद देत नाहीत. ज्यांना ऑक्सिजनची गरज अधिक असते, अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी ही उपचार पद्धत वापरली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे लक्षण असणारे रुग्ण आढळून येत आहे. अशा रुग्णांना प्लाझ्मा थेरपी लाभदायी ठरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

नागरिकांमध्ये प्लाझ्मा दानाबाबत गैरसमज

#प्लाझ्मा दान केल्यावर आपल्या शरिरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होईल

# पुन्हा कोरोना होईल

#अशक्तपणा येईल

# रक्तातील सर्व पेशी काढून घेतील

दररोज 15 प्लाझ्माची गरज !

शहरात दिवसाला एक हजाराहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरात आजपर्यंत 39 हजार 859 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यापैकी 26 हजार 220 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 10 हजार सक्रिय रुग्ण उपचार घेत आहे. अत्यावस्थ अवस्थेतील रुग्णांना जीवनदान देण्यासाठी दररोज प्लाझ्माच्या 8 ते 15 बॅगांची गरज भासते.

याबाबत थेरगाव सोशल फाऊंडेशन समितीचे सदस्य अनिल घोडेकर म्हणाले, ”शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे.

त्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. प्लाझ्मा प्राणवायू सारखा आहे. एका प्लाझ्मा दात्यामुळे तीन रुग्णांचा जीव वाचू शकतो.

कोरोनातून बरे होऊन 28 दिवस पूर्ण झालेला व्यक्ती प्लाझ्मादान करु शकतो. थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे आम्ही कोरोनामुक्त झालेल्या 120 जणांना प्लाझ्मादान करण्यासाठी प्रेरित केले.

त्यांना वायसीएमच्या रक्तपेढीत नेण्याची, घरी सोडण्याची व्यवस्था केली. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर तो नॉर्मल होतो. त्याला प्लाझ्मा थेरपी लाभदायक ठरते.

पालिकेकडे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती आहे. त्यांच्याकडे जावून प्लाझ्मा घ्यावा. त्यांना प्रवृत्त करावे. कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मा मिळावे यासाठी वाट बघत बसलेले असतात.

महापालिकेने प्लाझ्मादानबाबत जनजागृती करावी. नगरसेवक, सेवाभावी संस्थांनी मदत करावी. प्लाझ्मादाते पुढे आले. तर, आपण अनेकांचे जीव वाचवू शकतो”.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”प्लाझ्मादानला कोरोनामुक्त रुग्णांचा प्रतिसाद मिळत आहे. आणखी प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.