Pimpri News : बाप्पा, कोरोनाला हद्दपार कर! गणरायाला भावपूर्ण निरोप  

एमपीसी न्यूज – सलग दुस-या वर्षी गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट असून, यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज (रविवारी, दि.19) अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूला हद्दपार कर, अशी प्रार्थना भक्तांनी गणराया चरणी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणेश विसर्जन घरात करण्याला प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे अनेक गणेशभक्तांनी घरातच गणेश विसर्जन केले. तसेच, गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या वतीने कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. प्रभागानुसार शहरात 107 ठिकाणी गणेश विसर्जनासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांनी मूर्ती संकलनासाठी केंद्र उभारली आहेत.

पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला प्रोत्साहन देत निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे.

चिंचवड येथील घाटावर संस्कार प्रतिष्ठान आणि तनपुरे फाउंडेशनच्या वतीने मूर्ती संकलन करण्यात आले. संकलित केलेल्या मूर्ती वाकड-विनोदेवस्ती येथील तळ्यात विधिवत विसर्जन केले जाणार आहे. पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक मंडळाला मिरवणूक न काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मंडपातच कृत्रिम हौद तयार करून गणेश विसर्जन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. अनेक मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत मंडपातच गणेश विसर्जन केले. भावपूर्ण वातावरणात शहरात शांततेत गणेश विसर्जन झाले.

 

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनादिवशी गर्दी टाळण्यासाठी आज (दि.19) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅम्प परिसरात सर्व दुकाने (मेडीकल, दुध वितरण वगळता) बंद ठेवण्यात आली होती. तरिही काही ठिकाणी दुकाने खुली ठेवल्याचे दिसून आले. तसेच, गणेश विसर्जनासाठी घरातच प्राधान्य देण्याची सूचना असताना गणेश भक्तांनी घाटावर गर्दी केल्याचे दिसून आले. या वेळी अनेकांना शारीरिक अंतर आणि मास्कचा विसर पडला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.