Pimpri News: कोरोनातून बरे झाल्यानंतरही काळजी घ्या; ‘या’ आजाराचा आहे धोका

एमपीसी न्यूज – लक्षणे नसली, तरी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रामुख्याने फुफ्फुसाचे इन्फेक्शन आढळून येते. यांसह इतरही आजारांची लक्षणे दिसून येतात. यावर मात करून अनेक रुग्ण बरे झालेले आहेत; मात्र त्यानंतरही त्यांच्यामध्ये ‘फायब्रोसीस’ म्हणजेच फुफ्फुसाचे इन्फेक्शन पुन्हा आढळून येण्याची शक्यता आहे. म्हणूनच कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांपैकी 10 ते 20 टक्के रुग्णांना या आजाराला नव्याने सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला न्यूमोनिया झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये फायब्रोसीसचा त्रास सुरू झाल्याचे आढळून येत आहे. या रुग्णांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आल्याचे तज्ज्ञ सांगतात.

फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साईड यांच्या अवागमनाची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये त्रास व्हायला लागतो. या रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

कोरोना काळात न्यूमोनिया असलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या उतींना क्षति पोहोचते. त्या ठिकाणी जाड आणि कठीण उतींमुळे फुफ्फुसांचे कार्य मंदावते. या काळात कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, नैराश्य यांसह काही लक्षणे व्यक्तीनुसार बदलत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

कोरोना होऊन गेल्यामुळे रुग्णांमध्ये अ‍ॅन्टीबॉडिज तयार होतात. त्यामुळे कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला साधारणत: सहा आठवडे म्हणजेच दीड महिना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नसते; पण त्यानंतर पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

जे गंभीर रुग्ण आहेत, अशांमध्ये हदय, किडनी आणि लिव्हरच्या आजारांची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना होऊन गेल्यावर साधारणत: दीड महिना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नसते. त्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसताच पहिल्या पाच दिवसांमध्ये उपचार घेण्यास सुरुवात करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

फायब्रोसिस म्हणजे काय?
आपल्या शरीराल कोणतीही जखम झाली. मग ती शरीरावर असो किंवा शरीराच्या आतमध्ये असेल. जखम तयार झाली की त्याचे व्रण तयार होतो. ती जखम बरी झाल्यानंतर त्याची खूण ते शरीरावर सोडते. तसेच फुफ्फुसाच्या बाबतीतही आहे.

फुफ्फुसाला इजा झाली तर त्याचे व्रण तयार होतात. जेव्हा फुफ्फुसाच्या ऊतींना इजा होते किंवा भेगा पडतात तेव्हा होणाऱ्या आजाराला फुप्फुसांचा फायब्रोसिस असे म्हणतात. या जाड, कठीण ऊतीमुळे फुप्फुसांचे कार्य व्यवस्थित पार पडत नाही. त्याचप्रमाणे फुप्फुसांच्या फायब्रॉइडने अधिक गंभीर स्वरूप धारण केले की, श्‍वास घेण्यास अडथळा येतो.

फुप्फुसांच्या फायब्रॉइडमुळे फुप्फुसाला पडणाऱ्या भेगा पूर्णपणे बऱ्या करता येत नाहीत, तसेच त्यांची वाढ थांबवण्यासाठी एकही उपचारपद्धती सध्या उपलब्ध नाही.

ही खबरदारी घ्यावी!
#पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
# ताप येणे, हगवण लागणे, कोरडा खोकला, तोंडाची चव जाणे या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.
#पहिल्या पाच दिवसात ही लक्षणे आढळतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

याबाबत बोलताना वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”फायब्रोसिसमुळे फुफ्फुसाचे आकुंचन आणि प्रसरण व्यवस्थित होत नाही. फुफ्फुसाचे कार्य हे ते किती प्रमाणात ऑक्‍सिजन आतमध्ये घेते यावर अवंलबून असते. फुफुसाला झालेल्या इजांमुळे हा आजार उद्भवतो. त्यामुळे फुफुसाला जखम होते, मात्र कालांतराने ती कमी होऊन जाते. पुढील धोका टाळण्यासाठी रुग्णांना आता सावध होणे आवश्‍यक आहे. काही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार घ्यावेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.