Pimpri News: सावधान ! शहरात साथीच्या आजारांमध्ये होतेय वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजारांमध्ये नोव्हेंबरपासून वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसल्यास उपचारासाठी त्वरित तपासण्या करुन सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) एक नोव्हेंबरपासून साथीच्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

ताप, पुरळ किंवा लाल चट्टे, सांधेदुखी सारखी डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरित ‘एनएसवन’ आणि ‘आयजीजीएम’ तपासणी करणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर चिकुनगुनिया असल्यास ताप, अंगदुखी, सांधे दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित दवाखान्यात उपचारासाठी जाणे गरजेचे आहे.

तसेच डासांच्या प्रादुर्भावापासून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मलेरियामध्ये ‘व्हायवॅक्स’ हा आजार जास्त तीव्रतेने आढळून येतो. मलेरिया एकदा झालातरी तो पुन्हा होऊ शकतो. हे सर्व आजार पांढऱ्या पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे अशक्तपणा वाढतो.

प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेतल्यास सर्व उपचारांवर इलाज शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत वायसीएममध्ये डेंग्यूचे 546, मलेरियाचे 353 आणि चिकुणगुणियाचे 190 रुग्ण दाखल झाले आहेत.

‘ही’  आहेत प्रमुख कारणे !

शिंकणे, खोकला, दूषित वातावरण, बदलते हवामान, डासोत्पत्ती केंद्र, पाण्याची डबकी, दूषित पाणी आणि अवकाळी पाऊस, अस्वच्छता आणि खुली गटारे, औषध फवारणीचे अत्यल्प प्रमाण, आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.