Pimpri News: कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध करून द्यावेत- मंगला कदम

कोरोना वगळता हृदयविकार, अर्धांगवायू, पोटाचे विकार, किडनीचे आजार अथवा अपघातातील जखमींना सरकारी अथवा खासगी रुग्णालयात तातडीची वैद्यकीय उपचार अथवा बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी मनपाचे विविध रुग्णालय उपलब्ध आहेत. मात्र, शहरात कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे इतर आजारांसाठी व अपघातातील जखमींसाठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी सरकारी व खासगी रूग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.

मंगला कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, शहरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वायसीएम, तालेरा, जिजामाता, भोसरी ही रुग्णालय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच, अण्णासाहेब मगर स्टेडिअम, बालनगरी व ऑटो क्लस्टर येथील जम्बो कोवीड सेंटर या रुग्णांसाठी सेवेत रूजू आहेत. त्याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयातील सुमारे 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आलेले आहे.

परंतु, कोरोना वगळता हृदयविकार, अर्धांगवायू, पोटाचे विकार, किडनीचे आजार अथवा अपघातातील जखमींना सरकारी अथवा खासगी रुग्णालयात तातडीची वैद्यकीय उपचार अथवा बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय उपचार विना रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांसाठी व अपघातात जखमी झालेल्या नागरिकांसाठी तातडीची वैद्यकीय उपचार मिळणे अत्यावश्यक आहे.

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांसाठी तातडीची वैद्यकीय मदत व उपचार मिळावे यासाठी सरकारी व खासगी रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी योग्य ते आदेश देण्यात यावे अशी मागणी मंगला कदम यांनी केली आहे. तसेच, वायसीएम रुग्णालय पूर्ववत करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.