Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिकेतही बेळगाव विजयाची पुनरावृत्ती होईल – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – बेळगाव महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी आनंद व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या येत्या निवडणुकीतही या विजयाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्ष पातळीवर पहिल्यांदाच लढविल्या गेलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने 36 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. या विजयाबद्दल भाजप शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी बेळगाव भाजपचे अभिनंदन केले. या विजयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपच्या विजयाने जनता भाजपबरोबरच असल्याचे सिद्ध झाले आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या येत्या निवडणुकीत बेळगाव विजयाची पुनरावृत्ती होईल. मागील निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या. पाच अपक्षांनी भाजपची पाठराखण केली. त्यामुळे पालिकेतील पक्षाचे संख्याबळ 82 झाले. यावेळी महापालिका निवडणुकीत पक्षाने शंभर प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. संघटनेची व स्थानिक आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांची ताकद व कार्यकर्त्यांच्या बळावर येत्या महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.