Pimpri news: ‘पिंपळे सौदागर-पिंपरीगाव नियोजित समांतर पुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करावे’ – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर- पिंपरीगाव दरम्यान पवना नदीवर उभारण्यात येणाऱ्या नियोजित समांतर पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात नाना काटे यांनी महापौर उषा ढोरे यांची भेट घेऊन याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. त्यात पिंपळे सौदागर, पिंपरीगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी कॅम्प भागातील नागरिकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी पिंपळे सौदागर-पिंपरीगावाला जोडणाऱ्या पुलाला एक समांतर पूल उभारावा. यासाठी नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार व पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश म्हणून समांतर पुलाच्या कामाला नुकतीच परवानगी देण्यात आली आहे. या पुलामुळे या भागातील हजारो नागरिकांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात व जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. ते खऱ्या अर्थाने शहराचे विकासपुरुष आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते या समांतर पुलाचे उद्घाटन व्हावे असे समस्त पिंपळे सौदागर व पिंपरीतील रहिवाशांची इच्छा आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांची या पुलाच्या भूमिपूजनसाठी वेळ घेऊन त्यानुसार उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे.

तसेच या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनाही निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे यांनी महापौर ढोरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1