Pimpri news: ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या अभिनंदन ठरावाला भाजपची टाळाटाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता दिल्याबद्दल आणि अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजना, नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी मांडलेल्या ठरावावर सत्ताधारी भाजपने कोणताही निर्णय घेतला नाही. शिवाय राज्य सरकारचे अभिनंदन करणेही टाळले. या अभिनंदन ठरावाला माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोध केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (मंगळवारी) आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

मागील पाच वर्षांपासून शहरवासीयांची मागणी असलेल्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्रमांत 1 ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस राज्य मंत्रिमंडळाच्या 10 फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 946 कोटी 73 लाख एवढा खर्च येणार आहे.

या मार्गिकेची लांबी 4.41 किलो मीटर इतकी असून यात 3 स्थानके आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मेट्रोला मान्यता मिळाली.

राज्याचा अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजना जाहीर केल्या आहेत. आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेकरिता भरीव तरतूद केली आहे. राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना त्यांनी जाहीर केली आहे.

1 एप्रिल 2021 पासून नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्य सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. त्यानिमित्त राज्य सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी मांडला. त्याला राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अनुमोदन दिले.

या प्रस्तावाला विरोध करताना माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, सव्वा वर्षांपासून राज्य सरकार जनतेचे सरकार आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एखादी गोष्ट केली की अभिनंदनाचा प्रस्ताव आणून आपली टिमकी वाजवून घेतात. राज्यात बिघाडी सरकार असल्याची टीका पवार यांनी केली.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्षेप घेऊ लागले. त्यामुळे महापौर ढोरे यांनी पवार यांना खाली बसण्याची सूचना केली. त्यानंतर महापौरांनी अभिनंदन ठरावावर कोणताही निर्णय न घेता पुढील कामकाज सुरू केले. तसेच राज्य सरकारचे अभिनंदन करण्यासही टाळाटाळ केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.