Pimpri News : भाजप नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर; शहरातील राजकीय समीकरणे बदलणार ?

पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करत त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर चांगले विचार आणि काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्यास आपण देखील सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमानंतर राजकीय समीकरणे बदलण्याबाबत गौप्यस्फोट केला. अनेकजण आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील देखील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अजित पवार यांचे निकटवर्ती आणि उद्योजक अभय मांढरे म्हणाले, “भाजपच्या अ‍ॅक्टिव्ह नगरसेवकांचा मोठा गट भाजपच्या कार्यशैलीवर नाराज आहे. ज्या नगरसेवकांना काम करायचे आहे, त्यांना संधी नाकारण्याचे प्रताप भाजपकडून केले जात आहेत. त्यामुळे काम करण्याची इच्छा असूनही संधी मिळत नसल्याची खंत अनेकजण खासगीत बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली असून आपण अजित पवार यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले असल्याचेही मांढरे म्हणाले.

मांढरे यांनी सांगितले की, नगरसेवक रवी लांडगे यांच्या अजित पवार भेटीमुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. हा भाजपला धक्का असू शकतो. काहीजण स्वबळावर निवडून आलेले आहेत. त्यांना चांगले काम करायचे आहे. मात्र पक्षाच्या पुढे जाऊ शकत नसल्याने त्यांची कोंडी होत आहे.

माझं पिंपरी-चिंचवड शहरावर प्रेम आहे. शहर राष्ट्रवादीमध्ये लवकरच चांगले बदल केले जाणार आहेत. जे चांगले विचार घेऊन आले आहेत. ज्यांना काम करण्याची खरोखर तळमळ आहे, त्यांना घेऊन पुढे जाणार असल्याचेही नाराज गटातील नगरसेवकांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटल्याचे मांढरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.