Pimpri News: स्थायी समितीत भाजप नगरसेवकांचा आकांडतांडव; ग्लास फोडला, फाइल भिरकविली अन् माईकही तोडला

एमपीसी न्यूज – टक्केवारीवरून नेहमीच वादात सापडणाऱ्या स्थायी समितीत आता चिंचवड विरुद्ध भोसरी असा संघर्ष उफाळून यायला सुरुवात झाली आहे. निवडणूक आचारसंहितेत सभा कामकाज करता येत नाही. असे स्पष्ट असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी आकांडतांडव केले.

सभा तहकूब करण्याचा ‘सांगावा आम्हाला का धाडला नाही’, असा त्रागा करत या नगरसेवकांनी काचेचा ग्लास फोडला, फाइल भिरकविली आणि माईकही तोडला. या घटनेमुळे अधिकारी वर्गही अवाक झाला.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. कोरोना कालावधीत सभा कामकाज ऑनलाईन पद्धतीने घ्यावे असा नियम राज्य सरकारने घालून दिला आहे. त्यामुळे स्थायी समितीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होत आहे.

त्यातच कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्याच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. पालिका पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. दालनावरील पाट्याही उतरविल्या आहेत, असे असताना स्थायी समितीची सभा घ्या, असा अट्टहास सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांनी धरला.

सभागृहात अध्यक्ष संतोष लोंढे, भाजपचे अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम आणि अभिषेक बारणे हे चार सदस्य उपस्थित होते. तर, 16 पैकी इतर सदस्यांची ऑनलाईनही गैरहजेरी होती. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर शासकीय कामानिमित्त मुंबईला गेल्याने या सभेला गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार प्रमुख म्हणून उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त सुभाष इंगळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, संजय घुबे उपस्थित होते.

सभा कामकाजात उपस्थितांचे स्वागत करत शुक्रवार (दि. 6) पर्यंत सभा तहकूब करत असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. आणि ते सभागृहातून बाहेर पडले. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी अजित पवार यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सभा तहकूब होण्याचा निरोप आम्हाला अगोदर का सांगितला नाही असा आक्षेप घेत आयुक्त श्रावण हर्डीकर का गैरहजर आहेत. त्यांचा निषेध करायचा का, असे सुनावतच एका नगरसेवकाने ग्लास फोडला तर दुसऱ्याने फाईल भिरकावली, माईकची तोडफोड केली. हे सगळे नाट्य पाहून अधिकारीही चक्रावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.