Pimpri News: ‘एक बूथ 30 यूथ’ उपक्रमाच्या माध्यमातून भाजपची मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ‘टार्गेट’ पिंपरी विधानसभा मतदार संघ राहणार आहे. या मतदार संघात भाजपचा आमदार नाही. पण, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप दोघांनीही या पिंपरीत लक्ष घातले आहे. ‘एक बूथ 30 यूथ’ उपक्रमाच्या माध्यमातून भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

सत्ताधारी भाजपने मतदार संघनिहाय सक्षम बूथ अभियान सुरू केले. चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील बूथ बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासोबतच आता पिंपरी विधानसभा मतदार संघात ‘एक बूथ 30 युथ’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक झाली.

प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ता अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, बाबू नायर, महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, मंडलाध्यक्ष विजय शिनकर, महेंद्र बाविसकर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार लांडगे आणि जगताप यांनी बूथ यंत्रणेसाठी लोक कसे जोडायचे? सुमारे 30 ते 35 हजार लोकांच्या प्रभागामध्ये पक्षाने केलेली विकासकामे कशी पोचवायची? प्रत्येक हजार लोकांमागे 30 कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण कसे करायचे? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, पिंपरी मतदार संघातील भाजपची कामगिरी आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा विश्वासही दोन्ही आमदारांनी व्यक्त केला आहे.

पिंपरीत भाजपची ताकद वाढणार – अमोल थोरात
पिंपरी मतदार संघातील लोकांसाठी भाजपचे दोन आमदार आहेत. दोघांनी एकत्रित लक्ष घातल्यामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे. पिंपरीतून जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापुढील काळात प्रभागस्तरावर बैठका घेण्यात येणार आहेत. कामकाजाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.