Pimpri News : विशिष्ट भागातील विकासकामे भाजपने राजकीय आकसापोटी थांबवली; राहुल कलाटे यांचा आरोप

विषय नामंजूर करण्यामागे चिंचवड विधानसभा निवडणुकीची झालर असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील विशिष्ट भागातील विकासकामे राजकीय आसपोटी थांबवली आहेत. प्रशासनाने संबंधित विकासकामांची आवश्यकता असल्याचे सांगूनही चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दबावाखाली भाजपकडून या विकासकामांना खोडा घातला जात आहे. हे विषय नामंजूर करण्यामागे चिंचवड विधानसभा निवडणुकीची झालर असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे.

गुरुवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत वाकड गावातील वाकड उड्डाणपूल ते काळा खडक, तत्व हॉटेल ते बालवाडकर पेट्रोल पंप, ताथवडे येथील गाडा रोड या महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे विषय मांडण्यात आले होते. भाजपने हे विषय मतदान घेऊन फेटाळले.

प्रशासनाने देखील याबाबत सांगितले की, या रस्त्यांची गरज आहे. हे रस्ते 70 टक्क्यांपेक्षा अधिक महापालिकेच्या ताब्यात आहेत. पालिका आयुक्तांनी संबंधित रस्त्यांवर भेट देऊन पाहणी केली आहे.

परिसरातील सर्व सोसायट्यांच्या वतीने आयुक्तांना या रस्त्यांबाबत निवेदने दिली आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या कामांचे विषय मांडले होते.

_MPC_DIR_MPU_II

संबंधित रस्त्यांसाठी बांधकाम परवानगी विभागाने कोट्यावधी रुपयांचे विकसन शुल्क घेतले आहे. चांगले रस्ते, वीज पाणी मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. परंतु भाजपने या कामांना विरोध केला आहे.

महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांवर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा दबाव असल्याचा आरोपही कलाटे यांनी केला आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे झाली आहेत.

शहरात डांबरी रस्त्यांवर सिमेंट अंथरण्याचे काम सुद्धा ब-याचं ठिकाणी चालू आहे. इथे मात्र गरज असूनही रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक थांबवली जात आहेत. विकास कामांना खोडा घालून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे.

स्थायी समितीच्या मागील बैठकीत आमदार महेश लांडगे समर्थकांनी राहुल कलाटे यांना पाठींबा दिला होता. काल झालेल्या राजीनामा नाट्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता लांडगे आणि जगताप समर्थक एक झाले असल्याचेही कलाटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.