Pimpri News : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या स्वयंसेवकांचा भाजपतर्फे सन्मान

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – देशातील आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या जनार्दन वाठारकर, भालचंद्र देशपांडे या स्वयंसेवकांचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे सन्मान करण्यात आला. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे, मोरेश्वर शेंडगे, दक्षिण भारत आघाडीचे राजेश पिल्ले, प्रदेश कार्यकारिणीचे सचिव अमित गोरखे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी उपस्थित होते.

जम्मू-काश्मिरमधील 370 कलमाच्या विरोधात डॉ. श्मामाप्रसाद मुखर्जी यांनी जनआंदोलन उभा केले होते. ‘एक देश में दोन निशान, दो विधान और दो प्रधान नहीं चलेंगे’ अशी घोषणा त्यांनी दिली होती. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली.

मात्र, ती बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली होती. त्यावेळी जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस आदी अनेक राजकीय विरोधकांना तरुंगात डांबण्यात आले होते. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आली होती. तसेच, रा. स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदीही घातली होती.

25 जून हा काळा दिवस म्हणून पाळणार : आमदार लांडगे

आमदार महेश लांडगे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 25 जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.