Pimpri News : भाजपने शहरवासीयांवर ‘पे अँड पार्क’चा भार लादला, नागरिकांनी पार्किंगचे पैसे भरु नयेत : गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिक गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीला सामोरे जात आहोत. महामारीने जनता जनार्दन त्रस्त असून कोरोना काळात सर्वांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. या संकट काळात कामगारनगरीतील कष्टकऱ्यांना , करदात्यांना मदत करणे आवश्यक असताना ‘श्रीमंत’ महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरवासीयांवार ‘पे अँड पार्क’चा भार लादल्याचा घणाघाती आरोप शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केला आहे.

नागरिकांनी ‘पे अँड पार्क’ चे पैसे न भरता ‘असहकार’ आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , प्रधान सचिव विकास खरगे, महेश पाठक, भूषण गगरानी आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

घोळवे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड शहरात ‘ पे अँड पार्किंग ‘ योजना 1 जुलै 21 पासून लागू झाली आहे. महापालिकेने त्यासाठी 450 जागा निवडल्या आहेत. या पे अँड पार्कला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक, कष्टकऱ्यांची नगरी आहे. या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक उदरनिर्वाहासाठी आले आहेत. कोरोना महामारीने अनेकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत प्रपंच कसा करायचा, चरितार्थ कसा चालवायचा असा सवाल कष्टकरी, गोरगरीबांसह मध्यमवर्गीयांना पडला आहे.

संकट काळात नागरिकांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजपने शहरवासियांवर आणखी आर्थिक भार टाकला आहे. पे अँड पार्कच्या नावाखाली नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. वाहने लावण्यासाठी नवीन कर लादला आहे. शहरातील बहुतांशी रस्त्यांवर पे अँड पार्क सुरु केले आहे. सर्वच वाहनचालकांना पार्किंगसाठी पैसे मोजावे लागत आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांची दमछाक होत असताना पे अँड पार्किंग योजना सुरु करून महापालिकेने मध्यमवर्गीय, कामगार, गोरगरीबांवर अन्याय केला आहे. शाळा , बँक, दुकाने, मॉल अशा ठिकाणी केवळ 5 ते 10 मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना 5 ते 10 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ही योजना नागरिकांची आर्थिक लूट करणारी ठरत आहे.

पैसे वसूल करणाऱ्या ठेकेदाराने अथवा महापालिकेने वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली नाही. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यान्वित नाहीत किंवा सुरक्षारक्षकही तैनात नाहीत. पे अँड पार्क योजना सुरु करण्यापूर्वी नागरिकांच्या बैठका घेऊन, त्यांना योजनेची माहिती, योजनेचा फायदा कसा होईल याबाबत चर्चा घडवून आणणे आवश्यक होते.

सर्वांना परवडेल आणि आर्थिक झळ बसणार नाही असे धोरण सत्ताधारी भाजपने ठरवायला हवे होते. परंतु , घाईघाईत योजना राबविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शिवसेनेचा या योजनेला तीव्र विरोध आहे. लोकभावनेचा विचार करुन भाजपने ‘पे अँड पार्क योजना रद्द करुन सर्वसामान्य जनतेला आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणीही गोविंद घोळवे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.