Pimpri News: डॅमेज कंट्रोलसाठी भाजप प्रभारी माधुरी मिसाळ पिंपरीत !

भाजप दक्ष ! प्रभारींची नाराजांशी 'वन-टू-वन' चर्चा; प्रभारींच्या बैठकीकडे अनेकांची दांडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आठ ते नऊ महिन्यांवर येवून ठेपली असताना भाजप नगरसेवकांमधील नाराजी उफाळून येण्याची शक्यता, अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर, भाजप नगरसेवकांनी अजित पवारांची घेतलेली भेट, यापार्श्वभूमीवर भाजप प्रभारी माधुरी मिसाळ यांनी नाराज नगरसेवकांची वन-टू वन संवाद साधला. त्यांचे नाराजीचे कारण जाणून घेतले. ही नाराजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविण्याची ग्वाही दिली.

महापालिका निवडणूक वर्षभरावर येवून ठेपली आहे. मागील चार वर्षात भाजपच्या अनेक नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही. हे शेवटचे वर्ष आहे. सक्षम असतानाही अनेकांना पदे मिळाली नसल्याची भावना आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी आहे.

पुण्यातील काही नगरसेवक पक्षांतराच्या मार्गावर आहेत. पिंपरीतीलही अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली असून त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पिंपरीतील भाजपचे 25 ते 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजप खडबडून जागा झाला आहे.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रभारी, पुण्यातील पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आल्या होत्या. त्यांनी बैठका घेतल्या, सर्वांचे मत जाणून घेतले. नाराजांशी वन-टू-वन संपर्क साधला. अडचणी जाणून घेतल्या. तुमच्या सर्वांच्या तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर व्यक्तिशा घालेल, असे नाराजांना आश्वसत केले.

मिसाळ म्हणाल्या, सर्वांनी सक्रीय व्हावे. लोकांमध्ये संपर्क वाढवा. येणा-या काळात हेवेदावे सोडून एकत्रित काम करा. आगामी निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. दरम्यान, दापोडी, कासारवाडी, वल्लभनगर या मंडळाचे प्रभारी- आमदार सुनील कांबळे यांनीही आढावा घेतला.

प्रभारींच्या बैठकीकडे अनेकांची दांडी !

प्रभारी माधुरी मिसाळ या शहरात येवून देखील अनेकांनी बैठकीकडे पाठ फिरविली. 50 टक्केही लोक बैठकीला उपस्थित नव्हते. प्रभारी शहरात येवूनही अनेकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.