Pimpri news: महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचा ‘आक्रोश’

एमपीसी न्यूज – राज्यातील महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने आज राज्यभरात’ आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात भोसरीत देखील भाजपने आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला.

भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील पीएमटी चौकात ’आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. त्यानंतर निगडी प्राधिकरण येथे तहसीलदार गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात महापौर उषा ढोरे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, राजेश पिल्ले, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक विलास मडिगेरी, नितीन काळजे, सुरेश भोईर, कुंदन गायकवाड, विकास डोळस, केशव घोळवे, महिलाध्यक्षा उज्वला गावडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, उषा मुंडे, शारदा सोनवणे, शैला मोळक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांड तसेच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हाॅस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र सुरूच आहे.

वारंवार तक्रारी, निवदने व आंदोलन करून देखिल या असंवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन ’भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या’ वतीने छेडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करावा. केंद्र सरकारने महिलांविरोधातील अत्याच्याराविरोधात जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचना लागू कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III