Pimpri news: भाजपने भ्रष्टाचाराचे खापर आयुक्तांच्या माथी फोडू नये – संजोग वाघेरे

आयुक्तांकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेत 2017 ला भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील श्रावण हर्डीकर यांना आयुक्तपदी बसवले.

मागील तीन वर्षापासून अगदी 1 जून 2020 पर्यंत भाजपचे आमदार, सर्व नगरसेवक आयुक्तांचे गोडवे गात कौतुुुकांचा वर्षाव करत होते; मात्र अचानक पालिका आयुक्तांकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव होत असल्याचा साक्षात्कार महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांना झाला. हे म्हणजे  चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचेे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केलीे. तसेच भाजपने भ्रष्टाचाराचे खापर आयुक्तांच्या माथी फोडू नये असेही ते म्हणाले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाघेरे म्हणतात, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शालेय साहित्य खरेदीचे तब्बल 2 कोटी 43 लाख रुपयाचे विषय मागे घेतल्याने सत्ताधारी भाजपकडून आयुक्तावर आगपाखड सुरू केली आहे. आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिलगिरी व्यक्त करून खरेदीचा निर्णय थांबवला. त्यामुळे मलई खाण्यास मोकळे रान हवे असणाऱ्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा थयथयाट सुरू झाला आहे. भ्रष्टाचाराचे खापर प्रशासनाच्या माथी फोडण्यासाठी महापौर व स्थायी समितीचे अध्यक्ष यांनी थेट पालिका आयुक्तांकडून भाजपाला बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याची टीका केली.

वाघेरे पुढे म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून काम करावे. लॉकडाऊनमुळे राज्यातील तसेच शहरातील शाळा सुरू नाहीत. मागील वर्षी खरेदी केलेले शालेय साहित्य धूळखात पडले होते. तर यावर्षी शाळा सुरू नसतानाही स्थायी समितीच्या बैठकीत शालेय खरेदी 2 कोटी 43 लाख रुपयांचे विषय आणण्यात आले.  ते आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरचे विषय मागे घेतले. एक उत्तम प्रशासक म्हणून आयुक्तांच्या या निर्णयाचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वागत करतो. मात्र सत्ताधाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचे खापर आयुक्तांच्यावर फोडणे निंदनीय आहे, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध व्यक्त करत आहे.

महापालिकेचे अधिनियम कलम 673 नुसार तातडीची खरेदीचे अधिकार आयुक्तांना आहेत. याच अधिनियमानुसार मार्च 2020 पासून अत्यावश्यक साहित्य खरेदी थेट पद्धतीने करण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. कोरोना सारख्या परिस्थितीत थेट खरेदीच्या नावाखाली महापालिकेत अनेक गैरप्रकार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडकरांच्या कष्टाचा पैसा महापालिकेत कररूपी जमा होतो. या पैशाचा होत असलेला भ्रष्टाचाराचा सर्व हिशोब राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर मांडणार आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.