Pimpri News: भाजपने पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसली – गोविंद घोळवे

महापालिकेवर भगवा फडकवा, शिवसंपर्क मोहिमेचा समारोप

एमपीसी न्यूज – भाजपने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा, शास्तीकर माफीच्या निव्वळ घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही. पिंपरी – चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपने केले आहे. ’80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य असून शिवसैनिकांनी घराघरात शिवसेनेचे विचार रुजवावेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भगवा फडकवावा, असे आवाहन शिवसेना राज्य संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी केले.

शिवसेना पिंपरी – चिंचवड कार्यकारिणीतर्फे राबविण्यात आलेल्या शिवसंपर्क मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घोळवे यांच्या उपस्थितीत मोहिमेची सांगता करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 14 ते 24 जुलै दरम्यान पिंपरी – चिंचवड शहरामध्ये शिवसंपर्क मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत संपुर्ण शहरात वातावरण निर्मिती करण्यात आली.

शिवसेनेची विचारसरणी, हिंदुत्ववाद, ठाकरे सरकारचे महत्त्वाचे जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. घरभेटीदरम्यान ज्येष्ठ शिवसैनिकांना सामावून घेण्यात आले. नामफलक अनावरण, नवीन शाखांचे उद्घाटन, रक्तदान, अन्नदान असे उपक्रम राबविण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांच्या कार्यालयांमध्ये शिवसंपर्क मोहिमेची सांगता करण्यात आली.

शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे म्हणाले, शिवसैनिकांनी प्रत्येक घराघरात शिवसेना पोहोचवली पाहिजे. लोकांना शिवसेनेबद्दल कमालीचे आकर्षण आहे. पिंपरी – चिंचवड शहरात शिवसेनेचा हक्काचा मतदार आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली पाहिजे. वार्डा वार्डात, प्रभागात शाखा उघडल्या पाहिजेत. शिवसेना शाखा या सर्वसामान्यांना न्याय देणारी केंद्र झाली पाहिजेत. शिवसैनिकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून शिवसेना संघटना भक्कम करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.

भाजपने पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसली!
भाजपने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा, शास्तीकर माफीच्या निव्वळ घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही. पिंपरी – चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपने केले आहे. आपल्याला भाजपकडून सत्ता खेचून घेत शिवसेनेचा महापौर करायचा आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाआघाडी व्हावी, हे माझे वैयक्तिक मत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धडाडीचे नेते असून त्यांच्या प्रयत्नाने शहराचा कायापालट झाला आहे असेही गोविंद घोळवे म्हणाले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.