Pimpri News: ‘आवास योजने’त घर मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून पैसे घेतले, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देतो म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून पैसे घेतले, तसेच आर्थिक व्यवहार केले आहेत. संगणकीकृत सोडत पूर्णपणे ‘मॅनेज’ होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने आज (मंगळवारी) केला. भाजपप्रणित अनेक एजंटनी गोरगरिबांना घरे देतो म्हणून कमिशन लाटल्याच्या नागरिकांच्या असंख्य तक्रारी आमच्या पर्यंत आल्या आहेत. त्यामध्ये डिजीटल घोटाळा होणारच होता, असा आरोपही त्यांनी केला.

महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या 3664 सदनिकांच्या सोडतीचा नियोजित कार्यक्रम सोमवारी अचानक रद्द झाला. त्यावरुन सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

राष्ट्रवादीने श्रेयवादासाठी सोडत रद्द करुन गरीबांना घरांपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावर राष्ट्रवादीने पत्रकार परिषेद घेऊन भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.

सदनिका सोडतीच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार केला होता. 3664 सदनिकांची सोडत होती. प्रत्यक्षात सोमवारी नागरिकांसमोर केवळ साडेतीनशे लाभार्थ्यांची सोडत काढली जाणार होती. बाकीचे अर्ज ‘मॅनेज’ करणार होते, असा गंभीर आरोपही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.

सोडतीमध्ये डिजीटल घोटाळा होणारच होता. भाजप कार्यकर्त्यांनी गोरगरीबांकडून कोट्यवधी रुपयांचे कमिशन लाटले आहे. काही जणांकडून ॲडव्हान्स देखील घेतल्याचा तक्रारी आहेत. त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोतच, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्तांनी चार वर्ष भाजपला दरोडेखोरीचे लायसन्स दिले

राष्ट्रवादीने श्रेयासाठी संगणकीय सोडत रद्द करण्यास भाग पाडले. या भाजप पदाधिका-यांच्या आरोपात काही तथ्य नाही. 8 लाखात गरीबांना लुटून घर देण्याचे श्रेय भाजपलाच मिळावे. या श्रेयातही आम्हाला वाटा नको. पण नियोजन व कायदा याचा ताळमेळ ठेवावा हीच माफक अपेक्षा. तसेच ज्यांना घरे मिळणार नाहीत. त्या गोरगरीबांचे 5 हजार रुपयांप्रमाणे महापालिकेकडे सुमारे 20 कोटी जमा आहेत. ते सुध्दा घरे न मिळणा-या कष्टकरी अर्जदारांना व्याजासह परत करण्याची दानत ठेवावी.

आयुक्त श्रावण हर्डीकरांच्या दालनात आंदोलन करताना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती. ज्या आयुक्तांनी चार वर्षात भाजपला दरोडीखोरी करण्याचे लायसन्स दिली. त्यांच्या दारात आंदोलन केले हिच भाजपीय संस्कृती आहे, असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.