Pimpri News: उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई घुले यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले यांची आज (मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतल्याने घुले यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, महापौर महिला आणि आता उपमहापौरपदही महिलेकडे आल्याने शहराची धुरा महिलांच्या हाती आहे.

केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि.19) अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी भाजपकडून प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हिराबाई घुले यांचा तर विरोधातील राष्ट्रवादीने तळवडेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल केला होता.

निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज (मंगळवारी) रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

अर्जांची छाननी झाली. दोनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यावेळेत राष्ट्रवादीच्या भालेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या हिराबाई घुले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.