Pimpri News : स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या टेक महिंद्रासह तीन कंपन्यांना काळ्या यादीत टाका : प्रशांत शितोळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीअंतर्गत शहरातील स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या कामांमध्ये मोठा घोटाळा आहे. या कंपनीने सायबर हल्ल्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अगोदर सांगितले. नंतर एका रुपयाचेही नुकसान झाले नसल्याचा दावा कंपनीने केला. या दोन वाक्यातच त्यांचा खोटेपणा दिसून येतो. त्यामुळे टेक महिंद्रासह त्यांच्या सहकारी कंपनीचे काम तातडीने थांबवून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली.

याबाबत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात शितोळे यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या कामांमध्ये मोठा घोटाळा आहे. या कंपनीला क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विस प्रा. लि. व आरकेस इन्फोटेक प्रा. लि. या दोन कंपन्या भागीदार असून यातील एका कंपनीतील काही मालकी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांच्या घरातील दिसते.

त्यामुळे आमच्या शहरातील नागरिकांचा डेटा उद्याच्या काळात जगजाहीर होऊन भाजपाईना खिरापती सारखा वाटला जाणार आहे. यात आम्हाला शंका वाटत नाही. टेक महिंद्रा या कंपनीवर पिंपरी-चिंचवडने कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न तयार होतो. भविष्यात या कामाची 5 वर्ष देखभाल-दुरुस्ती हीच कंपनी करणार आहे. त्यामुळे असे खोटे सांगणाऱ्या कंपनीवर प्रशासन म्हणून कितपत विश्वास ठेवणार हे तुम्हाला स्पष्ट करावे लागणार आहे.

टेक महिंद्रा कंपनीच्या ताब्यात ‘सीसीसी’ म्हणजे कमांड कंट्रोल सेंटर आहे. याचा अर्थ शहरातील प्रत्येक गोष्टीची नोंद व नजर ही या कंपनीच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपल्या शहरवासीयांना खोट्या तक्रार दिलेल्या या कंपनीच्या तांत्रिक गोष्टींमध्ये अडकून राहावे लागणार आहे. शहराचा गोपनीय वाटणारा अतिशय मोठा व महत्त्वाचा डेटा ही कंपनी इतरांनासुद्धा का विकू शकणार नाही किंवा का वाटू शकणार नाही? अशी शंका आहे.

शहरातील नागरिकांच्या डेटा बाबतची जबाबदारी प्रशासन म्हणून आपण घेणार किंवा दुसर्‍या कोणावर सोपवणार त्याचेही नाव जाहीर करावे, अशी मागणीही शितोळे यांनी केली आहे.

टेक महिंद्रा या कंपनीने पोलिसात तक्रार करताना डेटा चोरीला गेला अशी तक्रार 1 मार्च 2021 रोजी केली होती. परत 5 मे रोजी डेटा चोरीला गेला नाही अशी माहिती दिली. हे संशास्पद आहे. टेक महिंद्राने महापालिकेची दिशाभूल केली. पोलिसांची सुद्धा फसवणूक केली आहे. त्यामुळे टेक महिंद्रा कंपनीवर सरकारी कामात अडथळा, सरकारी वेळेचा अपव्यय, सरकारी पैशाचे नुकसान, सरकारी यंत्रणेची फसवणूक, महापालिका, राज्य, शासन व केंद्र शासन यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करावा.

तसेच पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लि. व आरकेस इन्फोटेक प्रा. लि. या तीनही कंपन्यांना काळ या यादीत टाकावे, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.