Pimpri news: वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत ‘रक्तजल’ संकलनाचे कामकाज खासगी कंपनीला

प्रतिलीटर 2800 रुपये दर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय रक्तपेढीतील ‘रक्तजल’ संकलन करण्यासाठी ‘रिलायन्स लाइफ सायन्सेस’ या कंपनीला प्रतिलिटर 2800 रुपये या दराने कामकाज देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रक्तपेढी 24 तास कार्यरत आहे. या रक्तपेढीमार्फत विविध शिबिरे आयोजित करून रक्तदात्यांकडून रक्त संकलित केले जाते.

महापालिकेच्या अधिपत्याखालील, तसेच नियंत्रणाखालील सर्व रुग्णालयांकरिता आणि परिसरातील अन्य रुग्णालयांना रक्त आणि त्यातील घटकांच्या मागणीनुसार पुरवठा केला जातो.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका आयुक्तांनी 27 नोव्हेंबर 2019 रोजी वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्तजल संकलन करण्यास ‘रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ यांना आदेश दिला. त्यांच्यासमवेत केलेल्या करारनाम्याची मुदत 15 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात आली आहे.

या कामासंदर्भात इतर कंपन्यांकडून ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत रक्तजल संकलनासंदर्भात व्यत्यय येऊ नये, यासाठी तसेच महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता रक्तजल संकलनाचे कामकाज करण्यासंदर्भात इच्छुक कंपन्यांकडून दर मागविण्यात आले होते.

त्यानुसार चार कंपन्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांचे दर सादर केले आहेत. त्यामध्ये रिलायन्स लाइफ सायन्सेस यांनी प्रतिलिटर 2800 रुपये हा इतर कंपन्यांपेक्षा अधिकतम दर सादर केला. त्यानुसार त्यांना कामाचा आदेश देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.