Pimpri News : ‘ब्रेन डेड’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी घेतला अवयदानाचा निर्णय, अन् सहाजणांना मिळाले नवजीवन

एमपीसी न्यूज – अपघातात मृत झालेल्या रिक्षा चालकाच्या कुटुंबीयानी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे हृदय, स्वादुपिंड, यकृत, नेत्रपटल, दोन मूत्रपिंड, हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोचविण्यात आले यामध्ये एक मूत्रपिंड आणि यकृत हे डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर, बाकीच्या अवयवांचे प्रत्यारोपण पुण्यातील इतर रुग्णालयात करण्यात आले.    

_MPC_DIR_MPU_II

अपघातात गंभीर जखमी झालेल्या 38 वर्षीय रिक्षा चालकाला उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रिक्षा चालकाचा मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आला.

त्यानंतर मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांचे अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले.

रुग्णाच्या नातेवाईकांच्या दुःखाचा आघात बाजूला सारून अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.

कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उप कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.

नातेवाईकांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. अवयवदान हे एक पुण्यकर्म आहे. याबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे आज दिसून येत आहे. असे, मत डॉ. भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केले.

कुटुंबियांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो अशी भावना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली‌.

अवयवदान व प्रत्यारोपण बाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजूनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे असे मत डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.