Pimpri news : ठेकेदाराकडून थेट बँक खात्यात लाच ! डॉ. अनिल रॉय, सुनील बेळगावकर, सुनील लोंढे यांना आयुक्तांचा दणका
खातेनिहाय चौकशी सुरू : रॉय यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत आणि बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवसायाबाबत लपविली माहिती
एमपीसी न्यूज – नोंदणीकृत ठेकेदाराकडून थेट बँक खात्यावर पैसे घेणारे पिंपरी-चिंचवड पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर आणि बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. तिघांच्या या कृतीमुळे पालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले, तसेच रॉय यांचे आर्थिक अधिकार काढले.
रॉय यांनी मुलाच्या आणि बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवसायाबाबत पालिकेला कळविणे आवश्यक असतानाही हेतुपुरस्सर कळविले नाही. त्यामुळे रॉय यांच्या मुलाचा आणि बेळगावकर यांच्या पत्नीचा व्यवसाय अडचणीत आला आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते.
श्री कॅन्सट्रक्शन यांच्या जमा खर्चाच्या छायांकित प्रतीमध्ये सन 2017-18 टॅक्स ऑडीट रिपोर्ट मधील प्रतीमध्ये मालमत्ता म्हणून लोन ॲडव्हान्स या शीर्षाखाली डॉ. रॉय यांच्या नावे दोन लाख, बेळगावकर 80 हजार आणि लोंढे यांच्या नावावर दोन लाख 43 हजार 208 रुपये घेतल्याची नोंद आढळून आली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 ऑगस्ट 2020 रोजी द्विसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने 7 ऑगस्ट रोजी आयुक्तांना आपला अहवाल सादर केला.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियममधील नियम 4 (1 अ) मधील तरतुदीनुसार अधिकाराच्या स्थानिक कक्षामधील किंवा त्यांच्या कार्यालयीन कामकाजाशी ज्याचा संबंध येण्याचा संभव आहे अशा किंवा ज्या व्यक्तीचे कोणतेही आर्थिक उपकार त्याच्यावर होणार असतील अशा कोणत्याही व्यक्तीला पैसे देणार घेणार नाहीत अशी तरतूद आहे.
डॉ. रॉय, बेळगावकर व लोंढे यांनी आर्थिक व्यवहार करताना नियमांचा भंग करून रक्कम स्वीकारली आहे. ही बाब पालिकेस कळविणे आवश्यक असतानाही कळविली नाही.
शासकीय कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यापार, व्यवसाय करत असल्यास ते कळवणे आवश्यक आहे. रॉय यांनी मुलाच्या आणि बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवसायाबाबत पालिकेला कळविणे आवश्यक असतानाही हेतुपुरस्सर कळविले नाही.
याप्रकरणी डॉ. रॉय, बेळगावकर व लोंढे यांना 16 जून 2020 रोजी नोटीस बजावली होती. तिघांनी या नोटिशीचा खुलासा केला आहे. पण तो वस्तुस्थितीला धरून नाही. तिघांनीही पैसे घेतले असून त्याची माहिती पालिकेला दिली नाही.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. तिघांनीही सचोटी आणि कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी नियमांचा भंग केला आहे.
नेमून दिलेल्या कर्तव्यात सचोटी न राखता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डॉ. रॉय, बेळगावकर, लोंढे यांनी पदाचा गैरवापर केला आहे. यामुळे पालिकेच्या विश्वासाला तडा गेला असून पालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. तिघांची सचोटी संशयास्पद आहे.
त्यामुळे तिघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. चौकशी संपेपर्यंत यापूर्वी प्रदान केलेले डॉ. रॉय यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले आहेत.
तर, बेळगावकर, लोंढे यांना कोणतेही आर्थिक अधिकार, जबाबदारी न देता केवळ तांत्रिक स्वरूपाचे कामकाज सोपविण्यात यावे तसेच विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. या आदेशाची त्यांच्या सेवापुस्तकात नोंद करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.