Pimpri News : लाच प्रकरण! स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकासह चौघे निलंबित, खातेनिहाय चौकशी सुरु

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकासह चार कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि.18) रंगेहाथ स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक), राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लाच स्वीकारणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे.

या चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवता लोकसेवक म्हणून स्वत:च्या पदाचा, अधिकाराचा दुरुपयोग, गैरवापर करुन गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले. महापालिका कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या गैरवर्तनामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा भंग झाली. 48 तासापेक्षा जास्त कालावधीकरिता ते अटकेत आहेत. त्यामुळे महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरिया, राजेंद्र शिंदे आणि अरविंद कांबळे यांना अटकेच्या दिनांकापसून म्हणजेच बुधवार (दि.18) सेवानिलंबित करण्यात आले. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाची त्यांची सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

या चौघांना निलंबन काळात पहिल्या तीन महिने कालावधीसाठी अर्धवेतनी रजेवर असताना जितके रजा वेतन मिळाले असते. त्या रजा वेतनाइतकी निर्वाहभत्याची रक्कम देण्यात येईल. तीन महिन्यानंतर मूळ पगाराच्या तीन चतुर्थांश अधिक अर्जित रकमेच्या काळात अनुज्ञेय असलेले भत्ते मिळून होणारी रक्कम उपजिवीका भत्ता म्हणून देण्यात येईल. सेवानिलंबन काळात कोणत्याही ठिकाणी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही. नोकरी, व्यवसाय केला नसल्याचा दाखला दरमहिन्याच्या 20 तारखेच्या आत स्वत:च्या सहीने दिला पाहिजे. सेवानिलंबन काळात कार्यालयात, कार्यालयाच्या आवारात गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पिंपरी राहिल. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नसल्याचे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.