Pimpri News : क्षेत्रीय कार्यालयातील कोविड कॉल सेंटरमधील शिक्षकांच्या नेमणूका रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने कॉल सेंटरमधील शिक्षकांच्या नेमणूका रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी त्वरित मूळ आस्थापना असलेल्या विभागामध्ये रुजू होऊन पूर्ववत कामकाज करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत होता. परिस्थिती गंभीर झाली होती. प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. कोरोना रूग्णांचा वाढता संक्रमणाचा धोका विचारात घेऊन शहरात कार्यरत असणा-या विविध प्राधिकरणांच्या उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सहायक निबंधक या पदावरील अधिका-यांची पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना विषयक कामकाज करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

महापालिका शाळांमधील शिक्षकांचेही कोरोना कामकाजासाठी योगदान घेतले. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटर स्थापन करण्यात आले होते. या कॉल सेंटरमध्ये कर्मचा-यांची नेमणूक केली होती. त्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असणा-या 48 शिक्षकांची या कॉल सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील कॉल सेंटरमध्ये सहा शिक्षकांची नेमणूक होती.

आता शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दिवसाला दोनशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने शिक्षकांच्या नेमणूका रद्द करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.