Pimpri News : निविदा अटी शर्तीचा भंग केल्याबाबत पालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महापालिकेची कामे घेताना दिलेला एफडीआर एका ठेकेदाराने काम पूर्ण न करता बॅंकेतून मुक्त करून घेत त्याचे पैसे काढून घेतले. यातून निविदा अटी आणि शर्तींचा ठेकेदाराने भंग केला. याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 जून 2020 ते 22 जुलै 2021 या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी येथे घडला आहे.

ईलाही हसन शेख (वय 57, रा. रुपीनगर, निगडी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 24) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवाने (वय 28, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेची कामे घेण्यासाठी ठेकेदारांना ठराविक रकमेचा एफडीआर देणे आवश्यक आहे. मे. डी. डी. कन्स्ट्रक्शन्सचे मालक दिनेश नवानी यांनी एचडीएफसी बँकेचे एफडीआर बनविले. नवानी यांच्या कंपनीला महापालिकेची कामे मिळाली. त्यातील चार कामे पूर्ण केली नसताना तसेच पालिकेच्या आयुक्तांची पूर्व परवानगी न घेता एफडीआर परस्पर पिंपळे सौदागर येथील एका बँकेतून मुक्त करत त्याचे पैसे काढून घेतले. नवानी यांनी निविदा प्रक्रियेतील अटी व शर्तींचा भंग करत महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.