Pimpri News: महाविद्यालये, हॉस्टेलमधील ‘सीसीसी’ सेंटर बंद होणार

बालेवाडी, घरकुल, म्हाडा वसाहत, म्हाळूंगे, भोसरीतील बालनगरी, ऑटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटर सुरु राहणार आहेत. त्यामुळे बेडची कमतरता भासणार नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालये कदाचित सप्टेंबर मध्ये सुरु होतील. त्यामुळे हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटर (सीसीसी) बंद करुन हॉस्टेल महाविद्यालयाच्या ताब्यात द्यावे लागतील. त्यामुळे टप्या-टप्प्याने महाविद्यालयातील ‘सीसीसी’ सेंटर बंद केले जाणार असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेले नागरिक, स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले नागरिक आणि अलगीकरणासाठी शहराच्या विविध भागातील 11 ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ (सीसीसी) उभारले होते. त्यासाठी पालिकेने महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेतली होती. आता पालिकेने कोविड केअर सेंटरमध्ये वाढ केली आहे.

पीएमआरडीएच्या माध्यमातून नेहरुनगर येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित झाले आहे. ऑटो क्लस्टर येथील तात्पुरते रुग्णालय सुरू झाले आहे. त्यामुळे बेडची उपलब्धता वाढली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पालिकेने कोविड केअर सेंटरसाठी महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेतली होती. ताथवडेतील बालाजी लॉ कॉलेज, निगडी प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे हॉस्टेल, रावेत रावेतमधील डी. वाय. पाटील मुलींचे हॉस्टेल, मोशीतील आदिवासी विभाग मुलांचे व मुलींच्या हॉस्टेलमध्ये ‘सीसीसी’ सेंटर सुरु केले होते.

कोरोना पॉझिटीव्ह पण काहीच लक्षणे नसलेल्या रुग्णांवर सीसीसी सेंटरमध्ये उपचार केले जात होते. किवळेतील सिम्बॉयोसिस कॉलेजमध्येही सीसीसी सेंटर केले होते. पण, ते फक्त कर्मचा-यांसाठी वापरले जात होते.

महाविद्यालये कदाचित सप्टेंबर मध्ये सुरु होतील. त्यामुळे महाविद्यालयीतल हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटर बंद करावी लागतील. कोविड सेंटर बंद करुन हॉस्टेल महाविद्यालयाच्या ताब्यात द्यावे लागतील. टप्प्या-टप्याने महाविद्यालयातील हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर बंद केले जाणार आहेत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

बालेवाडी, घरकुल, म्हाडा वसाहत, म्हाळूंगे, भोसरीतील बालनगरी, ऑटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटर सुरु राहणार आहेत. त्यामुळे बेडची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वायसीएममध्येही नॉन कोविड रूग्णांवर होणार उपचार!

पालिकेचे वायसीएम रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयामध्ये सातशे बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी विविध आजारांवर उपचार केले जातात. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पालिकेकडे तेवढी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर वायसीएममध्ये उपचार सुरू केले.

रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले. रुग्णालय कोविड समर्पित केल्याने याठिकाणी येणाऱ्या शहरातील इतर आजारांच्या रुग्णांसोबतच आजूबाजूच्या रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पालिकेने बेडची उपलब्ध वाढविली आहे.

पीएमआरडीएच्या माध्यमातून नेहरुनगर येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे आता बेडची कमतरता भासणार नाही. त्यातच सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होण्याचा प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय इतर रुग्णांसाठी खुले करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.