Pimpri News: पन्नास लोकांच्या उपस्थितीत नाताळ साजरा करा, फटाक्यांची आतषबाजी करु नये; महापालिकेच्या सूचना

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. चर्चमध्ये जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. गर्दी करु नये, सुरक्षित अंतर बाळगावे, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवू नये, अशा मार्गदर्शक सूचना महापालिकेने दिल्या आहेत.

याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली. ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण उद्या, शुक्रवारी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

चर्चमध्ये निर्जुंतकीकरणासाठी व्यवस्था करण्यात यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सणादिवशी प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत-जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. वेगवेगळ्या माईकचा वापर करुन सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.

चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने, स्टॉल लावण्यात येऊ नयेत. 60 वर्षांवरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे. गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे, मिरवणुकांचे आयोजन करण्यात येवू नये. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवू नये.

ध्वनी प्रदुषणासंदर्भात नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करावे. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये संध्याकाळी सात वाजता किंवा त्यापूर्वी प्रार्थना घेण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.