Pimpri News: ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा’ – आमदार महेश लांडगे

आमदार महेश लांडगे यांचे ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपण फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करुया…असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केले. दिवाळीनिमित्त आमदार लांडगे यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांशी ‘फेसबूक लाईव्ह’ द्वारे संवाद साधला.

आमदार लांडगे म्हणाले की, दिवाळीच्या तेजस्वी पर्वाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनारुपी महासंकटाचा सामना करीत आहोत. आपल्या परिचित- अपरिचित अनेक कुटुंबांना या संकटाचा फटका बसला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कुटुंबियांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. त्या सर्वांचे स्मरण या सणाच्या निमित्ताने मला होत आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांना दिवाळी साजरी करता आली नाही. संबंधित कुटुंबांवर संकट कोसळले आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना आनंद साजरा करता येत नाही. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा सहवेदनाही लांडगे यांनी व्यक्त केल्या आहे. तसेच, दिवाळी साजरी करताना ज्यांना दिवाळीचा उत्सव साजरा करता येत नाही, अशा लोकांसोबत यावर्षी दिवाळी साजरी करुन सामाजिक बांधिलकी जपावी, असेही आवाहन लांडगे यांनी केले.

कोरोनाच्या संकटाला देशातील प्रत्येक नागरिक सामोरा जात आहे. दिवाळी उत्साहात साजरी केली पाहीजे. यात दुमत नाही. मात्र, यावर्षी आपण फटाकेमुक्त आणि पर्यावरणपुरक दिवाळी साजरी केली पाहिजे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे.

दिवाळी म्हणजे दीपोत्सव असतो. यावर्षीची दिवाळी कोरोनारुपी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असावी. संकटाला ऐकोप्याने कसे सामोरे जावे. याचा आदर्श पिंपरी-चिंचवड शहराने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत आनंदाचा सण साजरा करावा, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.