Pimpri News: गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, महापौरांचे नागरिकांना आवाहन

Pimpri News: Celebrate Ganeshotsav with simplicity, Mayor usha dhore appeals to citizens गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा मनातील भाव मोठा असला पाहिजे. म्हणून यावर्षी गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूची असावी.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातच नव्हे तर पूर्ण जगात कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळे, नागरिकांनी यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा. सर्व गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोविड योध्दे व स्वंयसेवक म्हणून पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा मनातील भाव मोठा असला पाहिजे. म्हणून यावर्षी गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूची असावी. मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास गणेशमूर्ती स्वंयसेवी संस्थाना मूर्तीदान कराव्यात. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटबीयांचे कोरोना साथीपासून रक्षण होईल.

त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी शासनाचे व महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.

मूर्तीदान करा

मूर्तीदान करण्यासाठी महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय 020-27650154, ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय 020-27450153, ‘क’ क्षेत्रिय कार्यालय 020-27122969, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय 9607957008, ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय 020-27230410, ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय 020-27650324, ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय 7887868555, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय 020-27142503 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

तसेच मूर्तीदान करण्याच्या उपक्रमास स्वंयसेवी संस्थानी आपल्या सेवेसंदर्भात क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहनही महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.