Pimpri News : ड्रेनेज लाईनच्या कामामुळे शगुन चौक व साई चौकात ‘चक्का जाम’

एमपीसी न्यूज – पिंपरीतील संत घाडगे महाराज चौकात ड्रेनेज लाईन दुरूस्तीचे काम सुरू आहे. यामुळे शगुन चौकातून डिलक्स चौकाकडे जाणारी वाहतूक साई चौकाकडे वळवली आहे. यामुळे शगुन चौक व साई चौकात वाहनांचा चक्का जाम होत आहे. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर होणा-या गर्दीमुळे याठिकाणी तासंतास वाहतूक खोळंबून राहत आहे.

वाहतूक वळवल्याने एकाच मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत आहे. यामुळे वाहन चालकांना मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, दुतर्फा पार्क केलेल्या दुचाकी, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि बेशिस्तपणे वाहन चालवणे यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत आहे.

पिंपरी कॅम्पमध्ये नेहमीच वर्दळ असते. त्यात आता मार्ग वळवल्याने दोन्ही चौकात तासंतास वाहतूक खोळंबून राहत आहे.

पिंपरीतील संत घाडगे महाराज चौकात ड्रेनेज लाईन दुरूस्तीच्या कामामुळे शगुन चौकातून डिलक्स चौक, काळेवाडीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

त्याऐवजी शगुन चौकातून साई चौक, जमतानी चौक ते काळेवाडी अशी वाहतूक वळवण्यात आली आहे. 16 डिसेंबर पासून पुढील 16 दिवसांसाठी हा आदेश लागू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.