एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वित्त विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी अजितदादांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळ देण्याचा उपदेश एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची कोरोनाची जबाबदारी पार पडतात का, याकडे लक्ष द्यावे. तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात कोरोनाची नियंत्रण करण्यास भाजपची जबाबदारी नाही, असे चंद्रकांतदादांनी प्रसिद्धीमाध्यमांत जाहीर करावे, असे टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी लगावला आहे.

एकीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती हाताळताना महानगरपालिका प्रशासन अपुरे पडत असून यासाठी पाटील यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा वाढला असतानाही राज्य सरकारने भाजपच्या सत्ता असलेल्या महानगरपालिकेमध्ये 33 टक्के खर्चाची मर्यादा असूनही शहराच्या विकासकामांना कोणताही खोडा न घालता राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून 1700 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिलेली आहे. मग यासाठी कोण जबाबदार? शहरातील कोरोना परिस्थिती बाबतीत महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांची काहीच जबाबदारी नाही का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

भाजपचे नेते कधीतरी शहरात येऊन केवळ राजकीय आरोप करण्यात धन्यता मानतात. उद्योगनगरीची आर्थिक मजबुती असल्याने यास राज्य सरकारने मर्यादा असून देखील विकास कामांना मान्यता दिलेल्या आहेत, हे वास्तव भाजपच्या नेत्यांनी विसरू नये. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नसतानाही केवळ राजकीय विरोध न करता अजितदादांच्या वित्त विभागाच्या अभिप्रायानंतर ही मंजुरी मिळाली आहे हे तमाम पिंपरी-चिंचवडकरांना माहित आहे.

महानगरपालिकेत 2017 पासून भाजपची सत्ता आहे. महापालिकेने 6 महिन्यात फक्त 150 कोटी रुपये शहराच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले आहेत. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त मेडिकल सुविधा देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे एक लाखाकडे वाटचाल असलेली कोरोना बाधितांची संख्या कमी होण्यास मदत झाली असती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केले आहे.

भाजपच्या सत्ताधाऱ्यांना केवळ विकासकामातून स्वार्थ जपण्यासाठी विकासकामे मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवली. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असताना विकास कामांमध्ये राजकारण न करता अजितदादांनी मंजुरी देऊन मनाचा मोठेपणा दाखवून दिला. मात्र यावर ब्र शब्द न करता चंद्रकांत पाटील हे अजित पवार यांच्यावर आरोप करत आहेत, अशी खंत वाघेरे पाटील व शितोळे यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील भाजपच्या कारभाऱ्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्यावर सुरू केलेले अन्याय पहावेत. शहरात आल्यानंतर फक्त विरोधी पक्षाकडे डोकावून पाहण्यापेक्षा शहराच्या विकासात स्वतःच्याच पक्षामुळे किती अडथळे येत आहेत त्याचीसुद्धा माहिती घ्यावी, असे आवाहन निवेदनात केले आहे.

भाजप नेत्यांकडून नेहमी सुडबुद्धीचे राजकारण केल्याचे अनेक वेळा दिसून आले. शहराची स्मार्ट सिटी साठी निवड होताना याचा अनुभव शहरवासीयांनी अनुभवला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राजकारणाशिवाय शहरांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत? किती ऑक्सिजन बेड आहेत? व्हेंटिलेटर बेड किती आहेत? इतर सुविधा कमी पडत असलेल्या ठिकाणी आपली सत्ताधारी म्हणून भूमिका काय आहे? हे सुद्धा शहरवासीयांना सांगितले पाहिजे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

भाजपची सत्ता असल्याने महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी काय सोयीसुविधा कराव्यात याचे आदेश देणे अपेक्षित होतं. पालिकेने मोठ्याप्रमाणावर नागरिकांची तपासणी, ऑक्सिजनची उपलब्धता, जास्तीत जास्त ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता करून देणे आजच्या काळात प्रथम प्राधान्य या क्रमाने करून देणे आवश्यक होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सत्ताधाऱ्यांना कोरोनासाठी उपाय योजनांचा खर्च करण्याचं सोडून विकासकामांची घाई झालेली आहे. विकास कामे जरूर करा, परंतु आजच्या काळात नागरिकांचा जीव सुद्धा महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी विकासाची साथ देईल. विकासाच्या कधीही आड येणार नाही, मात्र विकासाआडून भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.