Pimpri News : विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पक्ष कोणताही असला तरी मुख्यमंत्र्यांना (Pimpri News) विकास कामांसाठी भेटणे गैर नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघातील रस्त्यासह, वल्लभनगर आगराचा पुनर्विकास होईल, असा विश्वास पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मोरवाडी, शाहूनगर, दापोडी, पिंपरीगाव, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, भोईर, गावडे कॉलनी, लालटोपीनगर, वल्लभनगर, संत तुकारामनगर, चिंचवड स्टेशन परिसरात सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते केले जाणार आहेत. त्यासाठी निधी मिळणार आहे. औषध निर्माण महामंडळ (हाफकिन) येथील रस्तेही सिमेंट काँक्रीटीकरणाचे केले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने विकसित होणारे व सुमारे 25 लाख पेक्षा जास्त (Pimpri News) लोकसंख्या असलेले शहर आहे. उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. शहरामध्ये विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण येथील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. स्मार्ट होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकमेव वल्लभनगर बस स्थानक आहे. या बस स्थानकामधून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रवासी प्रवास करत असतात. दररोज किमान पाच हजार प्रवासी तसेच ST बसेसच्या 350 फेऱ्या वल्लभनगर बस स्थानकातून होतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक करणारे हे मुख्य ठिकाण आहे. तसेच भारतातील सर्वात पहिले ISO मानांकन प्राप्त असलेले बस स्थानक आज दुरावस्थेमध्ये आहे.

बस स्थानकाची इमारत ही 24 वर्षे जुनी असल्याने बऱ्याच ठिकाणी बस स्थानकाचे स्लॅब खचलेले आहे. बस स्थानकाचे फलाट कठडे मोडकळीस आल्याने जेष्ठ नागरिक व अपंग प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस स्थानक आवारात डांबरीकरण नसल्याने खड्डे पडलेले आहेत. बस स्थानकावर मुक्कामी येणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे मात्र त्या प्रमाणात पार्किंग व इतर सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. मुक्कामी येणाऱ्या चालक वाहकांसाठी अद्यावत असे विश्रामगृह नाही.

बस स्थानकात अनेक व्यवसायिक गाळे (Pimpri News) असून देखील त्यांना प्रतिसाद नसल्याने स्थानकाचे उत्पन्न कमी होत आहे. बस स्थानकाची भौगोलिक रचना ही व्यवस्थित नसल्याने बस स्थानकाला २ गेट असून देखील फक्त एक गेटचाच वापर करावा लागत आहे. बस स्थानकमधील वाहतूक नियंत्रक केबिन ही ओपन असल्याने व आवारात डांबरीकरण नसल्याने त्या ठिकाणी धळीचे साम्राज्य पसरले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने सुसज्ज असे बस स्थानक बांधून त्याचा पुनर्विकास करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यांनी त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत निधी देण्याची ग्वाही दिल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.