Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, चिंचवड गावातील रस्त्यांवर दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला झुगारून दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले.

दिवाळी अगदी तीन दिवसांवर आली आहे. त्यात महिन्याचा पहिला आठवडासुद्धा संपला असल्याने अनेकांचे पगार झाले आहेत. तसेच अनेकांना दिवाळी बोनसही मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक वसाहतीचे शहर म्हणून ओळखले जात असल्याने इथे कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार बहुतांश आहेत. पगार आणि बोनस मिळाल्याने त्यात दिवळीपूर्वीचा रविवार असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले.

रस्त्याच्या बाजूला दिसेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून वाहन चालक खरेदीसाठी दुकानांमध्ये गेले. दरम्यान नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, वाहतूक अडथळा निर्माण करणे, मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर वाहतूक पोलीस कारवाई देखील करत होते. शहरातील कोरोनाबधितांची संख्या घटली असली तरी कोरोना अजून संपला नाही, त्यामुळे जास्तीत जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

 
सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे अशा चुका केल्या तर लवकरच दुसरी लाट येऊ शकते. तरीही बाजारात अनेक नागरिक मास्क घालून खरेदी करत होते. दिवाळीसाठी किराणा बाजार, कपडे, आकाश कंदील, विद्युत सजावटीच्या वस्तू, लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य अशा अनेक गोष्टींनी बाजारपेठ देखील फुलली होती.

कोरोनाकाळात सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापारीवर्गाला देखील आर्थिक घरघर लागली होती. मात्र अनलॉकमध्ये अनेक आस्थापना सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे व्यापारीवर्गाला देखील दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या सहा ते सात महिन्यात झालेल्या सणांचा तोटा काही प्रमाणात भरून निघण्यास दिवाळीमुळे मदत होत असल्याने व्यापारी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.