Pimpri News: शहरातील नागरिकांना ‘या’ चार दिवशी महापालिका आयुक्तांना भेटता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना कामकाजानिमित्त भेटण्यासाठी येणा-या विविध अभ्यागतांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आली आहे. बुधवार वगळता सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या दरम्यान अभ्यागतांना महापालिका आयुक्त यांना भेटता येईल. आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.

महापालिकेशी संबंधित विविध कामकाजाच्या अनुषंगाने नागरिक पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय भवनातील आयुक्त कार्यालयात समक्ष येत असतात. त्यांच्या भेटीकरीता आयुक्त राजेश पाटील यांनी निश्चित वेळ राखून ठेवला आहे.

आयुक्तांकडे महापालिकेसंबंधित विस्तृत स्वरुपाचे कामकाज असल्याने काही प्रसंगी महापालिकेचे संबंधित अधिकारी अथवा पदाधिकारी यांच्यासमवेत कामकाजाच्या अनुषंगाने बैठका आयोजित केलेल्या असतात.

तसेच अत्यावश्यक कामकाज चालू असते. परिणामी कामकाजानिमित्त आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यागत अथवा नागरिकांना वेळ देता येत नाही.

म्हणून अभ्यागत अथवा नागरिक यांना आयुक्तांना भेटण्यासाठी कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र काही प्रसंगी आयुक्त हे अन्य शासकीय कार्यालय, मंत्रालय मुंबई येथे कामकाजानिमित्त जात असतात.

तसेच महापालिका सभा, स्थायी समिती सभा, विधी समिती सभांकरीता सभागृहामध्ये उपस्थित असतात. अशा प्रसंगी ते नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.