Pimpri News: शहरवासीयांनो जबाबदारीने वागा; अन्यथा लॉकडाउन – महापौर ढोरे

शहरातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस द्या

एमपीसी न्यूज – शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये; अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी दिला. तसेच कोरोना प्रतिबंधक लस शहरातील प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यासाठी महापालिकेने नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांच्या व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आयुक्त राजेश पाटील यांच्यासह पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि झोनल रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत घेण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, भाजी मार्केट अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असा आदेश महापौर ढोरे यांनी प्रशासनाला दिला.

भरारी पथकाद्वारे तपासणी मोहिम अधिक गतीमान करावी. नागरिकांना लसीकरणासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही. यासाठी दाट लोकवस्तीच्या भौगोलिक रचनेनुसार लसीकरण केंद्राची उभारणी करून त्याठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा ठेवावी अशा सूचनादेखील महापौरांनी यावेळी केल्या. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ढोरे यांनी यावेळी केले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियोजनाबाबत सर्व गटनेत्यांना महापालिका प्रशासनाने अवगत करावे, अशी सूचना पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली. रूग्णवाढ कायम राहिली तर महापालिकेचे नियोजन सर्वंकष असले पाहिजे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी कसलीही अडचण भासणार नाही, याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी. लसीकरण केंद्रात पुरेसे मनुष्यबळ असावे, अशा सूचनाही ढाके यांनी यावेळी केल्या.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, कोविड प्रतिबंधक लसीकरण कामकाजासाठी खासगी रुग्णालयाने पुढाकार घेऊन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. आपली यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे.

स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे म्हणाले, लसीकरण केंद्रासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक सुरक्षा तसेच कोरोना विषयक सुविधा पुरवावी. महापालिका रुग्णालये अद्यावत सुविधांनी सज्ज ठेवावे. नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.