Pimpri News : अभिजात नृत्य, गायनाने स्वरसागर महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेऊन यंदाच्या २२ व्या स्वरसागर महोत्सवाची शनिवारी सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात निगडी येथील नृत्यकला मंदिरच्या विद्यार्थिनींनी ‘नमो नटराजा’ हा भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘आंगिकन भुवनम यस्य’ या शिवस्तुतीने करण्यात आली. त्यानंतर पुष्पांजली, नटेश कौतुकम, अभिनयाचे दर्शन घडवणारी ‘पदम’ ही रचना सादर करण्यात आली. शुद्ध नर्तन सादर करणा-या ‘तिल्लाना’ नंतर तंजावरच्या शहाजीराजे भोसले यांच्या ‘मन भज शंकर नारायणा’ या शिव व विष्णू यांच्या एकत्रित ‘शिवमंगलम’ने या अभिजात भरतनाट्यम नृत्याची सांगता करण्यात आली. गुरु तेजश्री अडीगे यांच्या मार्गदर्शनाखाली रुचाली बोरुले, संस्कृती मगदूम, कुमुदिनी पाटील, सायली काणे आणि अनुजा हिरेकर या नृत्यांगनांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे निवेदन तेजश्री अडीगे यांनीच केले.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी आणि पंडितजींचे नातू विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. यंदाचे वर्ष हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने स्वरसागर महोत्सवाच्या माध्यमातून पंडितजींना स्वरवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी श्रीनिवास जोशी यांनी राग ‘मारुबिहाग’ सादर केला. ‘रसिया आयो ना’ हे शब्द असलेला बडा ख्याल त्यांनी यावेळी सादर केला. त्यांना स्वरसाथ त्यांचे पुत्र विराज जोशी यांनी केली. त्यानंतर दोघांनी मिळून ‘माझा भाव तुझे चरण’, आणि ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे दोन अभंग सादर केले. आपल्या गायनात त्यांनी भीमसेनजींच्या गायनाची काही ठिकाणी झलक दाखवून दिली. या दोघांना संवादिनीची साथ गंगाधार शिंदे यांनी, तबला साथ पांडुरंग पवार यांनी तसेच तानपुरा साथ मुरलीधर पंडित आणि प्रेरणा दळवी यांनी केली. गायनापूर्वी झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात यापूर्वी स्वरसागर महोत्सवात गायन सादर केल्याची हृद्य आठवण श्रीनिवासजींनी आवर्जून नमूद केली.

पहिल्या दिवशीच्या सांगतेच्या सत्रात मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरमार्तंड पंडित जसराज यांचे पट्टशिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायन सादर केले. संजीवजींनी जसराजजींकडे गुरुकुल पद्धतीने तालीम घेतलेली आहे. त्यामुळे मेवाती घराण्याच्या दर्जेदार गायकीचे यथार्थ दर्शन त्यांनी आपल्या गाण्यातून श्रोत्यांना घडवले. संजीवजींनी गायनाची सुरुवात राग ‘मालकंस’ने केली. ‘बिरहा सताये मोहे’ हे बोल असलेली विलंबित बंदिश सादर केल्यानंतर ‘गरज बदरवा डोले रे माई’ या द्रुतलयीतील बंदिशीमधून त्यांनी राग मालकंसाची सुंदर संरचना सादर केली. गायनानंतर त्या गाण्याचे मर्म उलगडून सांगताना त्यांनी गाण्याला दिलेली ख्याल ही उपमा म्हणजे आठवत आठवत, विस्तार करताना श्रोत्यांना कसं बांधून ठेवायचे याचे मर्म उलगडणारी होती. गायन म्हणजे ड्रायव्हिंग असते. एका ठराविक वेगाने शांतपणे जाताना आपण आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत जाऊ शकतो. मात्र वेगाने गेलो तर फक्त ड्रायव्हिंगकडेच म्हणजेच समोरच्या रस्त्याकडेच लक्ष द्यावे लागते हे सांगून त्यांनी रसिकांना एक वेगळीच दृष्टी दिली.

त्यानंतर संजीवजींनी ‘कलावती’ रागातील तराणा सादर केला. गमकयुक्त गाणे म्हणजे काय याचा सुंदर वस्तुपाठच त्यांनी रसिकांना यावेळी घालून दिला. त्यांनी गायनाची सांगता संत तुकाराम महाराजांच्या ‘आता कोठे धावे मन’ या अभंगाने केली. गायनसाथीच्या शिष्यांसह त्यांनी केलेला विठ्ठल नामाचा गजर रसिकांना भक्तीरसात चिंब भिजवून गेला. त्यांना संवादिनीनी अत्यंत समर्पक साथ अभिनय रवंदे यांनी केली. तसेच दमदार तबलासाथ रोहित मुजुमदार यांनी केली. गायनसाथ विलीना पात्रा, मुक्ता जोशी आणि साईप्रसाद पांचाळ यांनी केली. तानपुरा साथ स्मिता देशमुख यांनी केली. मी काहीतरी खास गातोय असा कोठेही अभिनिवेश नसलेले संजीवजींचे आश्वासक गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले.

या गायन सादरीकरणापूर्वी यंदाचा ज्येष्ठ गायक पंडित पद्माकर कुलकर्णी युवा कलाकार पुरस्कार युवा तबला वादक शंतनू देशमुख याला संजीवजींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलींद कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.