Pimpri news: स्वच्छ सर्वेक्षण ! हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल, गृहनिर्माण संस्थांसाठी स्वच्छता स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण 2021 जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. त्याची जोरदार तयारी पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्षातर्फे हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये यासाठी 70 गुणांक देण्यात आले आहेत.

शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात सुरु होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये 4041 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे, हा आहे.

याकरिता महापालिका क्षेत्रामधील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई, शासकीय कार्यालये यांच्यासाठी स्वच्छ पिंपरी-चिंचवड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

त्या मोहिमेत समाजातील सर्व घटकांचा समावेश राहणे आवश्यक आहे. याकरीता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबतचे निकष निश्चित झाले असून वैद्यकीय विभाग, शिक्षण मंडळ व क्षेत्रीय कार्यालय यांनी पाहणी करुन ‍निकाल घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘हे’ आहेत निकष !

हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई, शासकीय कार्यालये यांचे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ॲप डाऊनलोड इत्यादी निकषांचे आधारे गुणांक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. शौचालय साफसफाई- दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी. कच-याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करावे.

तसेच स्वच्छतेबाबत तक्रार करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन SWACHHATA MoUHA ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. स्पर्धेत संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. सर्वेक्षणाबाबत अर्ज व इतर माहिती क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

स्पर्धेमध्ये अर्ज भरण्याची मुदत 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत राहील. या स्पर्धेत शहरातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.