Pimpri news: पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू; पालिका पदाधिकाऱ्यांच्या मोटारी जमा

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक  आज (सोमवारी)  जाहीर करण्यात आली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या मोटारी जमा करण्यात आल्या आहेत. दालनावरील पाट्या झाकल्या जाणार आहेत.

राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, प्रभाग अध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींना   शासकीय वाहने दिली जातात. या पदाधिका-यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

सध्या महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती शासकीय वाहन वापरतात. त्यांनी वाहने जमा केली आहेत.  तर, बाकीचे पदाधिकारी स्वतःचे वाहन वापरत असून इंधन पालिकेकडून घेत आहेत. त्यांनी खासगी वाहनावरील सभापतीपदाचा बोर्ड झाकणे बंधनकारक आहे.

पालिकेतील दालनावरील पाट्या झाकल्या जाणार आहेत. कोरोनामुळे पाच महिने सभापतीपदाची निवडणूक झाली नव्हती. आठ दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. आठ दिवसांच्या आतच सभापतींना शासकीय वाहन सोडावे लागले आहे. 3 डिसेंबर 2020 पर्यंत आचारसंहिता आहे. महिनाभर पदाधिका-यांना वाहन वापरायला मिळणार नाही.

याबाबत बोलताना नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, “सध्या महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती शासकीय वाहन वापरतात. त्यांची वाहने जमा केली आहेत.  तर, बाकीचे पदाधिकारी खासगी वाहन वापरत असून त्यांनी मोटारीवरील सभापतीपदाचा बोर्ड झाकणाच्या सूचना दिल्या आहेत. दालनावरील पाट्या झाकणार आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.