Pimpri News : नागरिकांसोबत पोलीस आयुक्तांनीही केली कोरोना चाचणी; आयुक्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी पोलिसांच्या वतीने कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मंडई परिसरातील भाजी विक्रेते, हमाल, कामगार यांच्या टेस्ट केल्या जात आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही या शिबिराला भेट देऊन नागरिकांसोबत स्वतःची कोरोना चाचणी केली.

पिंपरी पोलीस चौकी येथे पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिक, भाजी मंडई मधील विक्रेते, हमाल आणि कामगार यांच्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट दिली.

संचारबंदीच्या काळात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. पिंपरी पोलीस चौकीच्या शेजारी पिंपरी मधील मुख्य भाजी मंडई आहे. पोलीस आयुक्तांनी मंडईमध्ये फेरफटका मारून विक्रेत्यांशी संवाद साधला. कोरोना साथीचा प्रदूर्भाव कमी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आयुक्तांनी यावेळी आवाहन केले.

पिंपरी मधील रॅपिड अँटिजेन शिबिरात सर्वसामान्य नागरिक, भाजी विक्रेते आणि हमाल यांच्यासोबत आयुक्तांनी देखील स्वतःची कोरोना अँटिजेन टेस्ट केली. या टेस्टमध्ये आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह आला. आयुक्तांनी स्वतः आपल्यासोबत टेस्ट केली असल्याने नागरिकांमधून त्यांचे कौतुक करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.