Pimpri News: कोरोनापासून बचावासाठी आयुक्तांनी सांगितली ‘ही’ त्रिसूत्री!

मास्कचा वापर, लक्षणे दिसताच चाचणी अन् पॉझिटीव्ह येताच 'सीसीसी' सेंटरमध्ये दाखल व्हावे

एमपीसी न्यूज – निर्बंध शिथिल केल्याने कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन पुढचे काही महिने शहरवासीयांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. मास्क घालणे, कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच चाचणी अन् पॉझिटीव्ह येताच ‘सीसीसी’ सेंटरमध्ये दाखल होणे. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवू शकतो, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

विविध सामाजिक संघटनांशी ऑनलाइन संवाद साधताना आयुक्त पाटील म्हणाले, निर्बंध शिथिल केल्याने रुग्ण वाढण्याचा धोका आहे. यापार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. मास्कमुळे 80 टक्के आपण सुरक्षित राहतो. लसीपेक्षा जास्त सुरक्षा मास्कमुळे मिळणार आहे. गर्दीत जाणे टाळावे,सुरक्षित अंतराचे पालन केले तर कोरोनाचा फैलाव रोखू शकतो.

कुटुंबातील लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित ठेवू शकतो. शहरातील 15 टक्के लोकांकडे मोठी घरे आहेत. 85 टक्के लोकांकडे डबलरुम टाईप घर आहे. जे लोक दररोज बाहेर जातात. त्यांनी बाहेरुन संसर्ग आणत नाहीत. याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसताच चाचणी करावी. पॉझिटीव्ह येताच काटेकोरपणे सीसीसी केंद्रामध्ये आयसोलेट व्हावे. त्यामुळे आपले कुटुंब सुरक्षित राहील. संस्थात्मक विलगीकरणास अनेकांचा विरोध असतो. पण, कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी विलगीकरण आवश्यक असते. या त्रिसूत्रीचा अवलंब केला. तर, कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवू शकतो.

तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने वॉर्ड लेवलवर कोविड दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे. वॉर्ड पातळीवर फ्युअर क्लिनिक, टेस्टिंग सेंटर, कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना जवळ चाचणी आणि आयसोलेट होण्याची सुविधा निर्माण होईल. सध्या रुग्णसंख्या कमी आहे. आत्तापासूनच टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन काटेकोरपणे केले. तर, संसर्गाचा वेग नियंत्रणात ठेवू शकतो.

1 रुग्णाच्या मागे 25 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे लागते. 1 हजार रुग्ण झाल्यास 20 हजार, 2 हजार झाल्यास 40, 3 हजार झाल्यास 60 हजार जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे लागते. एवढ्या लोकांचे ट्रेसिंग करण्याची यंत्रणेमध्ये क्षमता नाही. त्यामुळे सुरुवातीपासून काळजी घेणे आणि रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणे हा पर्याय आहे.

औषधे, बेडची उपलब्धता याची व्यवस्थित माहिती नागरिकांमध्ये पोहोचवणे आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांची हेळसांड होणार नाही. महापालिकेच्या दोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे 450 बेड वाढविले जात आहेत. लहान मुलांसाठी जिजामाता रुग्णालयात चाईल्ड वॉर्ड सज्ज केला आहे.

वायसीएमएचमध्ये म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांसाठी सुविधा करत आहोत. मुले आणि आईला सोबत ठेवण्यासाठी 1 हजार बेडचे कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. पण, सुरुवातीपासून रुग्ण वाढ होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी 400 कोविड मार्शल रस्त्यावर उतरले आहेत. सिरो सर्व्हे केला जात आहे. त्यामुळे किती लोकांमध्ये अ‍ॅण्टीबॉडी आहेत हे लक्षात येईल. त्यानुसार तिसऱ्या लाटेसाठी नियोजन करता येईल. कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन केले. तर, आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.

20 जूननंतर लसीचा पुरवठा वाढेल
बाहेरुन शहरात येणाऱ्या प्रत्येकाची टेस्टिंग बंधनकारक केले आहे. रुग्णवाढ होणाऱ्या भाग कंटेन्मेंट केला जाईल. लसीकरणाचा वेग वाढणार आहे. आत्तापर्यंत 5 लाख लोकांचे लसीकरण केले आहे. 20 जून नंतर लसींचा पुरवठा वाढेल. सध्या 25 टक्के लसी खासगी हॉस्पिटलला दिल्या जातात. दिव्यांग, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. लसींच्या उपलब्धतेवर सर्व नियोजन आहे. हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने लस निर्मितीची परवानगी सरकारकडे मागितली आहे. महापालिका एचएला आर्थिक सहकार्य करणार आहे.

लहान मुलांचे नियमित लसीकरण व्यापक स्वरुपात
लहान मुलांमध्ये संसर्ग वाढेल असा अंदाज आहे. पण, गंभीर होतील असे नाही. नियमित लसीकरण वाढवित आहोत. त्यातून मुलांची प्रतिकार शक्ती वाढले. बालरोग तज्ज्ञ, हॉस्पिटल यांच्याशी समन्वय आहे. लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर, औषधेची उपलब्धतता करत आहोत. दोन लाटेचा अनुभव घेऊन पुढचे काही महिने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नागरिकांनी जागरुक राहून काम करणे आवश्यक आहे. लढाई सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.