Pimpri News: पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंत्यांना आयुक्तांचा दणका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनात अपयशी ठरलेले पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दणका दिला आहे. त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभाग काढण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याकडे सह शहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपवत शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. तो अद्यापही सुरु आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा असूनही शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. समन्यायी पाण्याचे वाटप होत नाही. पाणीपुरवठा विस्कळीत आहे. याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.

एकदिवसाआड पाणीपुरवठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे अपयशी ठरले आहेत. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही लोकप्रतिनीधींकडून विविध आक्षेप घेतले जात आहेत.

या सर्व बाबींचा विचार करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रामदास तांबे यांच्याकडील पाणीपुरवठा विभाग काढला आहे. कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याकडे सह शहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.

तसेच शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा विभाग, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23 ची जबाबदारी लडकत यांच्यावर सोपविली आहे. त्यांना विभागप्रमुखांना देण्यात आलेले तसेच कामकाजाबाबत प्रदान केलेले प्रशासकीय व वित्तीय अधिकार वापरण्यासही मान्यता दिली आहे. तर, तांबे यांच्याकडे जलनि:सारण आणि पर्यावरण विभागाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.