Pimpri News: ‘कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी आयुक्त फिरणार गल्ली-बोळात’

पाणी प्रत्येकदिवशी देवू शकत नाही ही महत्वाची समस्या - आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – शहरातील नागरिकांच्या पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक या प्राथमिक गरजा आहेत. पाणी प्रत्येकदिवशी देवू शकत नाही, ही महत्वाची समस्या आहे. मी प्रश्नांकडे आव्हान म्हणून बघतो. गल्ली, प्रभागात फिरुन समस्यांचा आढावा घेतल्यानंतर विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविणार असल्याचे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. लोकांसाठी नेहमी उपलब्ध असेल. प्रशासनात कोणाची गय केली जाणार नाही. झिरो टॉलरन्स राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तपदाचा राजेश पाटील यांनी आज (सोमवारी) पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.

शहरातील पाणीपुरवठ्याबाबत दीर्घकाळाचा विचार केला केला जाईल. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आयुक्त पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर हे जलद गतीने विकसित झालेले शहर आहे. अनेक बाबतीत शहर नावाजलेले आणि गौरविण्यात आले आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करत बदल घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

लोकशाहित निर्णय कर्त्याला सर्वांची मते, विचार लक्षात घेवून निर्णय गरजेचे असते. पाहणी, तपासणी, आणि थेट कारवाई अशी कामाची आखणी करून हे शहर जागतिक दर्जाचे बनविण्याचा प्रयत्न करणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच शहराचे स्टॅंडर्ड मेंटेन करणे ही भविष्याची गरज आहे. नागरिकांच्या सोईचे कसे होईल याचा विचार करुन कामे केली जातील. त्यादृष्टीने प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात येतील.

प्रशासनात काम करताना अनेक नकारात्मक गोष्टी होत असतात. मात्र यातून सकारात्मक गोष्टी घेऊन काम केले तर पुढे जाणे शक्य होते. कोणताही समाज पुढे जातो तेव्हा तेथील नागरिकांची देखील प्रगती होते. शहराची प्रगती हा जादूचा प्रयोग नाही जादू केली आणि शहर सुधारले असे होणार नाही. त्यासाठी सर्वांनी बरोबर येऊन काम केले.

लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आणि सरकार दरबारी घेतली जाणारी त्याची दखल यावर हे अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांचे सहकार्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणार आहे. मूलभूत सुविधांची कामे होणार आहेत.मात्र त्याही पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक प्रकल्प दखल घेण्यासारखे आहे. शहर वरच्या स्थानावर कसे जाईल याचा विचार करावा लागणार आहे.

नागरिकांना ऑनलाईन सेवा देणार

पेपरलेस ऑफीस करण्यासाठी प्रयत्नशिल असणार आहे. नागरिकांना ऑनलाईन सेवा देणार आहे. महापालिका कर्मचा-यांचा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणी चुकीचे काम करत असल्यास कठोर कारवाई केली जाईल. झिरो टॉलरन्स दाखविला जाईल, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.