Pimpri News : कंपन्यांनी पोलीस स्टेशन दत्तक घेऊन त्यांचा विकास करावा – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एमटी विभागाचे नूतनीकरण, पार्किंग शेडचे उदघाटन

एमपीसी न्यूज – शहरात औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत. कंपन्यांनी आयुक्तालायला मदतीचा हातभार लावावा. ज्यामुळे आयुक्तालयाची आणि शहराची प्रतिमा बदलेल. कंपन्यांनी पोलीस स्टेशन दत्तक घेऊन त्यांचा विकास करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मोटार परिवहन विभाग पोलीस निरीक्षक यांचे कार्यालय, ऑइल रूम, मॅकेनिकल रूम, भांडार रूम आणि चालक विश्रांती कक्षाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्था, आकुर्डी यांच्या वतीने हे काम करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त बोलत होते.

या कार्यक्रमासाठी उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे, गणेश बिरादार, उप अधीक्षक गायत्री पवार, पोलीस निरीक्षक ए. एन. सय्यद, बजाज ऑटो लिमिटेडचे प्रदीप श्रीवास्तव, जनकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे कैलास झांजरी, सीईओडॉ. अरुण जोशी, सतीश धामणे, पी. एस. मुखर्जी, अनिल भंडारे, भवरलाल, सुशील आढाव, मदन गायकवाड आदी उपस्थित होते.

मोटार परिवहन विभाग येथे विविध वृक्षांचे रोपण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्याचे मैदान, व्यायामशाळा, नियंत्रण कक्ष, मोटार परिवहन विभाग असा या वास्तूचा प्रवास आहे. आयुक्तालयाच्या वाहन खरेदीसाठी नुकताच दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता आयुक्तालयाच्या ताफ्यात नवीन वाहनांची देखील भर पडणार आहे.

आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “नीतिशास्त्र शिकणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व देण्यासाठी त्यातली एक एक गोष्ट महत्वाची असते. सक्षम पोलिसिंग करण्यासाठी सरकार मदतीसाठी प्रयत्न करत आहे. जी संस्था सगळ्यांना सोबत घेऊन जाते आणि ज्या संस्थेसोबत सर्वजण असतात तीच संस्था यशस्वी होते. एमटीचे ए. एन. सय्यद यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, “सर्व पोलीस ठाण्याचे आयएसआय सर्टिफिकेश केले जात आहे. कंपन्यांनी जर पोलिसांची मदत केली तर कंपन्यांच्या अडचणीत पोलीस दोन पावले पुढे जाऊन त्यांची मदत करतील. इंडस्ट्रीचे लोक त्यांच्यावरील अत्याचाराबाबत अजूनही पुढे येत नाहीत. त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस कमी पडणार नाहीत, असाच पोलिसांचा प्रयत्न आहे.

उद्योजकांना जोखीम पत्करून उद्योग चालवावे लागतात. कामगार, उत्पादन मागणी, पुरवठा यासारख्या प्रत्येक बाबीकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. पोलिसांनी आपापल्या हद्दीतील उद्योग क्षेत्रात सुरक्षित वातावरण तयार करावे. त्यांच्याकडून सहकार्य घेऊन पोलीस ठाण्यांचा आणि पोलीस व्यवस्थेचा विकास करावा. इंडस्ट्री शहराचा विकास करते. देशासाठी कायपण, त्यापुढे सर्व स्वाहा, असेही आयुक्त म्हणाले.

उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, “मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक सय्यद यांनी सुरुवातीपासून प्रोऍक्टिव्हपणे काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून तसेच बजाज सारख्या संस्थांच्या माध्यमातून मोटार परिवहन विभागाचा विकास झाला. शहर पोलिसांसाठी लागणाऱ्या वाहनांचा मोठा बिकट प्रश्न आहे. त्यासाठी आयुक्तांनी पाठपुरावा करून दोन कोटींचा निधी मंजूर करून आणला. येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग शेड आणि अन्य बाबींची आवश्यकता लागेल. त्यासाठी बजाज संस्थेने सकारात्मकता दर्शवली आहे.

‘बजाज’चे कैलास झांजरी म्हणाले, “आम्ही पिंपरी चिंचवड पोलिसांसोबत आहोत. शहर पोलिसांची व्याप्ती प्रचंड आहे.
आम्हाला प्रत्येक वेळी चांगले सहकार्य केले. त्यामुळे आम्ही आमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करणार.

सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले. प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी केले. वायरलेसचे पोलीस निरीक्षक विठ्ठल जाधव यांनी आभार मानले.

मोठ्या भावावर जेवढी कृपा केली, तेवढीच छोट्या भावावर पण करावी

बजाजने पुणे पोलिसांना मोठ्या प्रमाणात वाहने दिली. पिंपरी चिंचवड शहरात त्यांची कंपनी असताना त्यांनी पुणे शहराला प्राथमिकता कशी दिली हे समजत नाही. तो कंपनीचा विषय आहे. पण आमच्याकडेही लक्ष द्यावे. पिंपरी चिंचवड हे पुणे शहराचा लहान भाऊ आहे. बजाजने मोठ्या भावाकडे लक्ष दिले. तसेच त्यांनी लहान भावाकडेही लक्ष द्यावे, असे सांगत पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील वाहनांच्या समस्येकडे लक्ष वेधले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.