Pimpri News: कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी कंपन्या घेणार पुढाकार

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व कोविड लसीकरणासाठी उपाययोजनांसदर्भात शहरातील कंपन्या सकारात्मक आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.

शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व कोविड लसीकरणाची संख्या वाढविण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका व शहरातील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती.

या बैठकीत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, केड्राई पुणे मेट्रोचे डॉ अंभ्यकर, अनिल परांडे, सतिश अगरवाल, हरनोल, स्मॉल स्केल इंडस्ट्री असो. चे अभय भोर, थरमॅक्स लि. चे सुनिल भोसले, राहुल चौगुले, गरवारेचे कमलकांत, टाटा मोटर्सचे रोहीत सरोज, एस. एस. भाले, लायन्स क्लब आकुर्डीचे ओमप्रकाश पेठे यांचेसह ऑनलाईन (गुगल मीट) द्वारा एकूण 30 कंपन्यांचे सीएसआर पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या सीएसआर सेलने आत्तापर्यंच्या कोरोना काळात मिळालेल्या मदती बद्दलचा आढावा सादर केला. आयुक्त राजेश पाटील यांनी सध्याची कोरोना परिस्थिती, कंपन्यांकडून असलेल्या अपेक्षा, अधिकाधिक सेंटर्स सुरु करण्याची तयारी, व इतर मागण्या यांबाबत चर्चा केली. सध्याच्या काळात लसीकरण वाढविण्यासाठी मनुष्यबळ, फ्रंटलाईन वर्कर्स / फ्रंटलाईन सेक्टर्स, कार्डियाक ऍम्ब्युलन्स इ. बाबत आवाहन केले. क्रेडाई कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कन्स्ट्रक्शन साईट येथे लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत इच्छा व्यक्त केली. तसेच वय वर्ष 45 च्या आतील लोकांना देखील लस देण्याबाबत विनंती केली. तसेच थेरगाव हॉस्पिटल येथे सुविधा देण्यास तयारी दर्शविली.

तसेच भारतीय जैन संघटनेची मदत घेण्याचा मार्ग सुचविला. टाटा मोटर्स कंपनीने संपूर्ण अभियानामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगुन त्यानुसार ऍम्ब्युलन्स पुरविणे, लसीकरण केंद्र चालविणे, फ्रंटलाईन वर्कर्सची व्यवस्था करणे या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासित केले. लायन्स क्लब पुणे आकुर्डी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत अधिकाधिक जागरुकता निर्माण करण्याचे सुचविले. तसेच त्याबाबत तयारी देखील दर्शविली. लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये लसीकरण केंद्र चालू करण्याची इच्छा व तयारी दर्शविली.

तसेच लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठीची पूर्ण यंत्रणा पुरविण्याबाबत तयारी दर्शविली. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सदर सभेचा आढावा घेत सर्व कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी विषयास अनुसरून पाठपुरावा करणे. लसीकरण उपक्रमासंदर्भातील गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या प्रयत्नांबद्दल तयारी दर्शविली. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व अधिकारी पदाधिकारी व सीएसआर प्रतिनीधी यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यास सीएसआरच्या माध्यमातुन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसदर्भात शहरातील कंपन्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.