Pimpri News: स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका पूर्णवेळ सुरु करा : विद्यार्थ्यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका पूर्णवेळ सुरु करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

याबाबत विद्यार्थ्यांकडून महापौर उषा ढोरे यांना निवेदन देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक होतकरु, गरीब विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयारी करीत आहेत. त्यांना स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा केंद्रांमध्ये सुविधा करुन देण्यात आलेली आहे. सध्या कोविड काळामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे अनेक आस्थापनांसह स्पर्धा परीक्षा केंद्र देखील बंद ठेवण्यात आले होते.

कोरोनासंबंधीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर मर्यादित वेळेमध्ये व मर्यादित विद्यार्थी संख्येत महापालिकेची स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका सुरु करण्यात आलेल्या आहेत. पुढील कांही दिवसांमध्ये केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर देखील महत्वाच्या विविध पदांकरिता स्पर्धा परिक्षा होणार आहेत.

शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धा परिक्षांमध्ये उज्वल यश संपादन करुन शहराचा लौकीक वाढविण्यासाठी महापालिका स्पर्धा परिक्षा केंद्रांचा उपयोग निश्चित होणार आहे.

महापालिकेच्या विविध स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी या केंद्राची वेळ वाढविण्याबाबत महापौर उषा ढोरे यांच्याकडे मागणी केली आहे.

या मागणीची तात्काळ दखल घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याकरिता महापौर ढोरे यांनी कोरोनासंबंधी शासकीय सूचना, नियम, अटींचे पालन करत या स्पर्धा परिक्षा केंद्राची वेळ वाढविण्याबाबत महापालिका प्रशासनास निर्देश दिले आहेत.

स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन प्रशासकीय क्षेत्रात प्रवेश करुन सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.